पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्यांविरोधात छेडलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे मारले. यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. ती व्यक्ती केवळ शेतकरीच नसून निवृत्त सैन्य अधिकारी कॅप्टन पीपीएस ढिल्लो (captain pps dhillon) असल्याचे दावे व्हायरल होताहेत.
‘दोन्ही फोटो एकाच माणसाचे आहेत. जवान पण आणि किसान पण ‘पी. पी. एस ढिल्लों’ (captain pps dhillon) असे यांचे नाव आहे, IT cell वाल्यांसाठी हे खलिस्तानी आहेत.’ अशा कॅप्शनसह जखमी शेतकऱ्याचे आणि निवृत्त सैन्य अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केले जाताहेत.
फेसबुक युजर वैभव छाया यांनीसुद्धा याच दाव्यांची पोस्ट शेअर केलीय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास व्हायरल पोस्ट आल्यानंतर प्रत्येक इमेज आम्ही रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. काही सर्चनंतर पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यातील उबोके गावचे सरपंच सुखविंदर सिंह यांची २९ नोव्हेंबर रोजीची फेसबुक पोस्ट सापडली.
यामध्ये त्यांनी त्यांचे वडील कॅप्टन पृथ्वीपाल सिंह ढिल्लो यांच्यासह फोटो शेअर केलाय. १७ शीख रेजिमेंट मध्ये कार्यरत असलेले कॅप्टन १९९३ साली निवृत्त झाले आहेत. त्यांनी १९६५, १९७१ आणि ऑपरेशन श्रीलंका युद्ध लढलं होतं, असंही यात म्हंटलंय.
जखमी शेतकऱ्याचा फोटो कुठून व्हायरल झाला हे शोधताना रिव्हर्स इमेज सर्च मध्ये आम्हाला रमणदीप सिंह मान यांचे ट्विट सापडले. यात त्यांनी त्या शेतकऱ्याचा फोटो शेअर करत ‘एक तरफ किसान अपने हक के लिए आर पार की कर रहा है, ठिठुरती हुई ठंड में रातों को बाहर सो रहा है और दूसरी तरफ कोई आज फिर मौज से अपनी मन की बात सुना रहा है ! #FarmProtests‘ असे कॅप्शन दिले आहे. हे ट्विट त्यांनी २९ नोव्हेंबर रोजीच केले होते.
व्हायरल पोस्ट मधील दोन्ही व्यक्तींचे पेहराव, दाढीची लांबी आणि ठिकाण सर्व वेगळे असताना त्यांचे एकाच दिवशी फोटो पोस्ट होणे हेच सुचवत आहेत की या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये दोन्ही व्यक्ती, त्यांचा पेशा, त्यांचे २९ नोव्हेंबर रोजीचे वास्तव्याचे ठिकाण या सर्व बाबी वेगवेगळ्या आहेत असे सिद्ध झाले. त्यामुळे जखमी शेतकरी सेना अधिकारी असल्याचे दावे करणाऱ्या पोस्ट चुकीच्या आहेत.
हेही वाचा: ‘शेतकरी आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, खलिस्तान जिंदाबादचे नारे’ भाजप नेत्यांचे दावे किती खरे?
[…] […]