केरळमधील मुस्लीम समुदायाने ‘युनायटेड मल्लापुरम’ (United Malappuram)नावाने वेगळा देश घोषित केलाय, यामध्ये केरळातील ६ जिल्ह्यांचा समावेश असून त्यांनी आपला स्वतःचा इस्लामिक पंतप्रधान सुद्धा ठरवला आहे. एवढेच नव्हे तर त्याचे स्वतःचे सैन्य सुद्धा आहे. अशा प्रकारचे दावे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.
‘फेसबुक‘ आणि ‘व्हॉट्सऍप’वरही हेच दावे जोरदार व्हायरल होत आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक विनय कुलकर्णी, सुनील गिरकर यांनी सदर व्हायरल दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने गुगलवर कीवर्ड सर्च केले असता असे लक्षात आले की हे दावे २०१८ सालापासून व्हायरल होत आहेत.
भारतातच नवा देश घोषित करणे ही सोशल मीडियात नव्हे तर देशाच्या प्रमुख माध्यमांत खळबळ माजवून टाकणारी बातमी आहे तरीही एकही प्रमुख वृत्तपत्र किंवा वाहिनीवर अशा प्रकारची बातमी नाही. यातच या डाव्यांच्या फोलपणाची शंका आली. दुसरी बाब अशी की व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित पाहिल्यास असे लक्षात येईल की उजव्या कोपऱ्यात असणारा मूळ लोगो काहीसा वेगळा आहे. त्यावर दुसरा लोगो चढवून, खाली ब्रेकिंग न्यूज, ‘प्राईम मिनिस्टर ऑफ मल्लापूरम’ असे लिहिलेले आहे.
व्हिडीओची सत्यता जाणण्यासाठी त्यातील प्रतिज्ञेमध्ये नेमके काय बोलले जात आहे ते समजणे जास्त महत्वाचे आहे. या प्रतिज्ञेचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे
भाषांतरीत प्रतिज्ञा:
“मी शपथ घेतो की, एक अभिमानी पक्ष केडर असल्यामुळे, माझा वेळ आणि संसाधने मुस्लिम आणि इतर मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी वापरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी आपल्या राष्ट्राची मूल्ये जपून राजकीय प्रगतीसाठी समर्पित होईल. एकता, अखंडता, शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द जपेल.
मला हे समजते की सूडाचे राजकारण, अतिरेकी, दहशतवाद हानीकारक आहेत आणि यामुळे आपले सामाजिक कल्याण नष्ट होईल. मी जीवनाच्या सर्व क्षेत्रातील विविधतेतील एकतेचे तत्वज्ञान टिकवून ठेवण्याची शपथ घेतो. मी ठामपणे आपल्या देशाच्या संविधानातील नैतिकता, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त या कल्पनेवर विश्वास ठेऊन एक कल्याणकारी राज्य साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी माझ्या देशाला संपूर्ण पाठिंबा देईन आणि माझे माझ्या देशावर प्रेम आहे.”
या एकूणच प्रतिज्ञेत कुठेही ‘यूनायटेद मल्लापूरम’ किंवा ‘प्राईम मिनिस्टर’ असे शब्द ऐकायला मिळाले नाहीत.
या व्हिडीओतील लोक नेमके कोण?
‘जून २०२१’ मध्ये ‘अल्ट न्यूज’ने सदर व्हायरल व्हिडीओची पडताळणी केली होती. त्यानुसार गणवेश परिधान केलेले तरून ज्यांना सलामी देत आहेत ते ‘पी के कुन्हालीकुट्टी’ (P K Kunhalikutty)आहेत. ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’ या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कुट्टीपूरम, वेन्गारा, मल्लापुरम या मतदारसंघांतून निवडणुका लढवून ते पूर्वी लोकसभा सदस्य बनले होते.
‘अल्ट न्यूज’ने त्यांच्याशी बातचीत केली असता कुन्हालिकुट्टी म्हणाले, “मला पंतप्रधान घोषित जरून सलामी दिली जात असल्याचे व्हायरल होणारे दावे फेक आहेत. 2008 साली झालेल्या कार्यक्रमाचा तो व्हिडीओ असून ते आमच्या पक्षाचे कॅडेट आहेत.”
पक्षाला अशा कॅडेट्सची गरज काय?
पक्षाचे जनरल सेक्रेटरी फैजल बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘2018 पूर्वी पक्षाच्या युथ विंगचे ग्रीन गार्ड असत, आता तेच 2018 नंतर संख्या वाढल्यानंतर व्हाइट गार्ड संबोधले गेले. पूरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी,राज्यातील रुग्णांना औषधे पोहचवण्यासाठी ही टीम कार्यरत असते. अशा मदत कार्याच्यावेळी आजही ही टीम हिरवा गणवेश वापरते.’या ‘व्हाइट गार्डसच्या कामाविषयी ‘द हिंदू‘मध्ये बातमी आली होती.
भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणाऱ्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही’ असेच स्वयंसेवक आहेत आणि त्यांनाही विशिष्ट प्रकारचा गणवेश आहे. ते देखील समाजसेवी कार्यांसाठीच असल्याचे सांगितले जाते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की केरळी मुस्लिम समुदायाने स्वतःचा ‘युनायटेड मल्लापुरम’ (United Malappuram) नावाचा वेगळा देश घोषित करून स्वतःचा वेगळा इस्लामिक पंतप्रधान निवडल्याचे सांगणारे व्हायरल मेसेज फेक आहेत. व्हिडीओ 2008 सालचा असून ते एक मुस्लिम पक्षाचे कॅडेट आहेत. ते घेत असलेली शपथ घटनेशी सुसंगत आहे.
हेही वाचा: केरळमध्ये हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्यापासून रोखले? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]
[…] […]