Press "Enter" to skip to content

पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडणाऱ्यांना योगी सरकारने धडा शिकवल्याचे दावे फेक!

‘परवा पाकिस्तानने मॅच जिंकल्यानंतर काही हौशी लोकांनी फटाकड्या वाजवून शुभेच्छा दिल्या त्यानंतर लगेच योगी सरकारनेही संबंधिताचा सत्कार केला तो अनमोल क्षण आपणही पाहवा.’ अशा दाव्यांसह एक १.१५ मिनिटांची व्हिडीओ क्लिप सोशल मिडियात व्हायरल होतेय.

Advertisement
अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दिनेश सूर्यवंशी, सुनीत अनगळ, सोपान गवळी आणि प्रशांत गावडे यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Source: Whatsapp

हाच व्हिडीओ ‘उत्तरप्रदेश- नो नमाज ऑन रोड’ असे लिहून देखील व्हायरल होताना दिसतोय. रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांची योगी सरकार कशी हकालपट्टी करतेय हे दाखवत सदर व्हिडीओ शेअर केला जातोय. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील आणि अजय कदम यांनी पडताळणीची विनंती केली आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यामध्ये दिसणाऱ्या दुकानाच्या शटरवर ‘एसदीन टेलर्स’ असे लिहिल्याचे दिसते आहे.

हे दुकान नेमके कुठे आहे हे शोधताना गुगल मॅपवर याचा पत्ता मध्यप्रदेशातील जबलपूरचा असल्याचे समजले. याच आधारे गुगल सर्च करून पाहिले असता ‘द टाईम्स ऑफ इंडिया‘ची बातमी आम्हाला मिळाली. या बातमीमध्ये वापरलेला फोटो आणि व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या शटरवरील ‘एसदीन टेलर्स’ तंतोतंत जुळणारे आहे.

Source: The Times of India

बातमीनुसार मध्यप्रदेशातील जबलपूर येथे ईदच्या दिवशी ज्या रस्त्यावरून मिरवणूक नेण्यास परवानगी नव्हती त्या ठिकाणी पोलिस आणि मुस्लीम जमावात बाचाबाची झाली. त्यावेळी काहींनी पोलिसांवर २० विटांच्या तुकड्यांचा मारा केला. यात ९ पोलिसांना किरकोळ दुखापतही झाली.

प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार सुरु केला. ९ पोलिसांसह एकूण २३ जण या दरम्यान जखमी झाले.

भारत पाक क्रिकेट सामना २४ ऑक्टोबर रोजी झाला. सदर बातमी २० ऑक्टोबर रोजी म्हणजेच ४ दिवस आधी प्रकाशित झाली आहे. साहजिकच व्हायरल व्हिडिओचा भारत-पाकिस्तान सामन्याशी काहीही संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत मुस्लीम जमावावर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ शेअर करत व्हायरल होत असलेले दोन्ही दावे फेक असल्याचे निष्पन्न झाले.

भारत-पाक सामन्याच्या ४-५ दिवस आधी उत्तरप्रदेशात नव्हे तर मध्यप्रदेशात ही घटना घडलीय. ईदच्या दिवशी रस्त्यावरून मिरवणूक नेण्याविषयी हा वाद झाला, यात रस्त्यावर नमाज पठण करण्याचाही काहीएक संबंध नाही.

हेही वाचा: ज्या इस्कॉन मंदिराच्या पुजाऱ्याने इफ्तारी दिली त्यांचीच निर्घृणपणे हत्या करण्यात आली? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा