सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खानचे वडील मीर ताज मोहम्मद (Mir Taj Mohammed) यांच्यावरील लेखाची क्लिपिंग व्हायरल होतेय. लेखामध्ये मीर ताज मोहम्मद यांच्या ‘भारत छोडो’ आंदोलनातील (Quit India Movement) योगदानाची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर दावा केला जातोय की लेखातील माहिती चुकीची आहे.
उजव्या विचारधारेशी संबंधितांकडून दावा केला जातोय की शाहरुखचा जन्म 1965 मध्ये झाला. भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये झाले. लेखानुसार शाहरुखच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील 30 वर्षांचे होते. म्हणजेच सालच्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांचे वय 6 वर्षे असेल. वयाच्या 6 व्या वर्षी शाहरुख खानचे वडील भारत छोडो आंदोलनात नेमकं काय करत होते?
फेसबुकवर देखील असेच दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत.
पडताळणी:
सर्वप्रथम तर मीर ताज मोहम्मद (Mir Taj Mohammed) यांच्यावरील ज्या लेखाची क्लिपिंग व्हायरल होतेय, तो मूळ लेख शोधला. अफ्फान नोमानी यांनी लिहिलेला हा लेख 6 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध झाला होता.
अफ्फान नोमानी यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून देखील हा लेख शेअर केला होता. या संपूर्ण लेखात कुठेही शाहरुखच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांचे वय 30 वर्षे होते, असा उल्लेख बघायला मिळत नाही.
लेखामध्ये म्हंटलंय,
“पेशावरमध्ये जन्मलेले मीर ताज मोहम्मद खान यांनी फाळणीपूर्वी पेशावर सोडले आणि वयाच्या 16 व्या वर्षी ते दिल्लीला आले. खान अब्दुल गफार खान (Khan Abdul Ghaffar Khan) यांच्या ‘खुदाई खिदमतगार’ (Khuda e khidmatgar) चळवळीत सामील झाले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.”
मीर ताज मोहम्मद यांचे मित्र आणि स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन सिंह यांनी 2010 साली ‘वन इंडिया’शी बोलताना मीर ताज मोहम्मद खान यांच्या आठवणीला उजाळा दिला होता. त्रिलोचन सिंह म्हणतात, “कदाचित खूपच कमी लोकांना कल्पना असेल की शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद मीर स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे भाऊ गुलाम मोहोम्मद गामा हे देखील स्वातंत्र्य सैनिक होते”
त्रिलोचन सिंह पुढे सांगतात, “मी आणि मीर ताज मोहम्मद दोघेही पेशावरचे. आम्ही दोघांनीही ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभाग घेतला आणि फाळणीनंतर पेशावर ऐवजी दिल्लीची निवड केली. इथे महत्वाची गोष्ट अशी की मी हिंदू होतो आणि आम्ही पाकिस्तान सोडले होते, पण तिकडे एक मुस्लिम होता ज्याने भारताची निवड केली”
अनुपमा चोप्रा (Anupama Chopra) यांनी शाहरुख खानच्या आयुष्यावर ‘किंग ऑफ बॉलिवूड’ (King Of Bollywood) हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये मीर ताज मोहम्मद यांच्या ‘भारत छोडो’ आंदोलनातील भूमिकेविषयी वाचायला मिळते. अनुपमा चोप्रा यांच्यानुसार भारत छोडो आंदोलनात 60,000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. त्यात मीर ताज मोहम्मद आणि त्यांचे भाऊ गुलाम मोहोम्मद गामा यांचा देखील समावेश होता.
मीर ताज मोहम्मद खान यांचा जन्म कधीचा?
राजधानी दिल्लीमधील दिल्ली गेट स्मशानभूमीत मीर ताज मोहम्मद खान यांची कबर आहे. त्यावरील माहितीनुसार मीर ताज यांचा जन्म 27 अक्टूबर 1927 रोजीचा आणि मृत्यू 19 सप्टेंबर 1980 रोजीचा. म्हणजेच 1942 सालच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी मीर ताज मोहम्मद खान हे 15 वर्षांचे होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की शाहरुख खानचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांच्याविषयी सोशल मीडियावर केले जात असलेले दावे चुकीचे आहेत. चुकीच्या दाव्यांच्या आधारे मीर ताज मोहम्मद खान स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका नाकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बघायला मिळतेय.
[…] हेही वाचा- शाहरुखच्या वडिलांची ‘भारत छोडो’ आंदो… […]