सोशल मीडियात डोक्यावर पैशांचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की सदर व्यक्ती सिन्नर तालूक्यातील नांदूरशिंगोटे गावातील शेतकरी विनायक हेमाडे (vinayak hemade) असून त्यांनी ४ एकरात घेतलेल्या कोथिंबिरीच्या पिकाला १२ लाख ५१ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
हेच फोटो वेगवेगळ्या फेसबुक पेजवरून पोस्ट होतायेत आणि तिथून अनेक लोक आपापल्या वैयक्तिक वॉलवरसुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर करतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ‘प्रवीण सोमवंशी’ यांनी आमच्याकडे फोटोच्या सत्यतेची पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणी :
सर्वप्रथम आम्ही व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी शोधाशोध केली त्यावेळी आम्हाला दै. पुढारीच्या नाशिक आवृत्तीच्या बातमीचा स्क्रिनशॉट मिळाला. या बातमीनुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे (vinayak hemade) यांच्या ४ एकर कोथिंबिरीच्या पिकाला १२ लाख ५१ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
हेमाडे यांनी ४ एकर क्षेत्रामध्ये ४५ किलो कोथिंबीरीचे बियाणे पेरले होते. ४१ दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर त्यांना जे उत्पादन मिळाले त्याची दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी खरेदी केली. हा व्यवहार १२ लाख ५१ हजार रुपयांमध्ये पार पडला, अशी माहिती पुढारीच्या बातमीत देण्यात आली आहे.
यासंदर्भातील बातमी आम्हाला ‘अग्रोवन ई ग्राम’ पोर्टलवर देखील वाचायला मिळाली. या बातमीत मात्र हेमाडे यांच्या कुटूंबाचा वेगळाच फोटो वापरण्यात आलेला आहे.
त्यानंतर आम्हाला नितीन बुचकुल या युट्यूब चॅनेलवर विनायक हेमाडे यांची मुलाखत बघायला मिळाली. आपण गेल्या ३ वर्षांपासून कोथिंबिरीच्या नॉव्हेल ग्रीन या वाणाचे पीक घेत असल्याचं हेमाडे या मुलाखतीत सांगताहेत.
कोथिंबिरीच्या पिकासाठी एकरी १५ ते २० हजार अशा रीतीने ४ एकरांसाठी ७० ते ८० हजार रुपयांच्या दरम्यान खर्च येत असल्याची माहिती देखील ते देतात.
आपण बी.ए. झालेलो असून गेल्या पंचवीस वर्षांपासून शेती करत आहोत. अशा प्रकारे एकदम १२ लाख ५१ हजार रुपये मिळतील असं कधीच वाटलं नव्हतं. पण आपण प्रयत्न करणं देखील कधीच सोडलं नाही, असं हेमाडे सांगतात.
‘अग्रोवन ई ग्राम’ची बातमी आणि ही मुलाखत विनायक हेमाडे यांची ओळख पटवून देतात.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीतील दावा खरा असला, तरी त्यासोबत व्हायरल फोटो फेक आहे.
व्हायरल फोटोत दिसणारी व्यक्ती विनायक हेमाडे नाहीत. कुणीतरी खोडसाळपणा करून हेमाडे यांच्या यशकथेसोबत चुकीचा फोटो जोडला आहे.
व्हायरल फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, परंतु अद्यापपर्यंत त्यासंदर्भातील खात्रीशीर माहिती आम्हास मिळालेली नाही. तशी माहिती मिळाल्यास ती अपडेट करण्यात येईल.
हे ही वाचा- मुस्लिम ‘एसपी’ युनिफॉर्म ऐवजी हिजाब मध्ये? वाचा व्हायरल फोटोमागचे सत्य!
[…] […]
[…] […]