Press "Enter" to skip to content

अण्णा हजारेंनी शिक्षकांचा अपमान केल्याचा दावा करणारी फेक बातमी व्हायरल!

सोशल मीडियावर एका बातमीचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी ‘नाहीतरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात’ असं विधान करत शिक्षकांचा अपमान केला असल्याचा दावा करणाऱ्या बातमीचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

Advertisement

शाळा-महाविद्यालये आणखी काही महिने बंद ठेवा, त्याने काही फरक पडत नाही. नाहीतरी शिक्षक तेथे जाऊन नेमका काय उजेड पाडतात? पण राज्यातील मंदिरे तातडीने उघडा. अन्यथा मी आंदोलन करीन, असा इशारा अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे. मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेऊन मंदिर उघडण्यासाठी समिती रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याबाबत माहिती दिली, असे बातमीत सांगण्यात आले आहे.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक नितीन वाहुळे यांनी सदर बातमीच्या पडताळणीची विनंती केली आहे.

पडताळणी:

 • अण्णा हजारेंनी (Anna Hazare) मंदिरे उघडण्याबात आंदोलनाचा इशारा दिला आहे का हे शोधण्यासाठी गुगलवर किवर्डच्या साहाय्याने शोध घेतला असता महाराष्ट्र टाईम्सची बातमी मिळाली. या बातमीनुसार नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये अण्णा हजारे यांना मंदिरे उघडण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यात आली होती.
 • ‘मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करा. तरीही १० दिवसांत जर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर जेल भरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील,’ अशी ग्वाही मंदिर बचाव कृती समितीला हजारे यांनी दिली होती.
 • दारूची दुकाने, हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाही का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवलं? मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल, असं हजारे म्हणाल्याचेही या बातमीमध्ये सांगण्यात आले आहे.
 • दरम्यान, संपूर्ण बातमीत कुठेही हजारेंनी शिक्षकांविषयी काही आक्षेपार्ह विधान केले असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे अधिक शोध घेतला असता या बातमीच्या संदर्भात अण्णा हजारे यांनी दिलेले निवेदन बघायला मिळाले. या निवेदनामध्ये अण्णा हजारे म्हणतात,

“औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’ या वर्तमानपत्रात ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात: अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली. बातमी वाचून आश्चर्य वाटले. जे विधान मी केलेलेच नाही, ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली असे वाटते. अधिक चौकशी करता असे निदर्शनास आले की, सदर बातमी फक्त औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’ या एकमेव दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. आमच्या वकिलांनी लोकपत्रच्या कार्यकारी संपादकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे.”

No photo description available.
Source: Facebook Page
 • आम्हाला महाराष्ट्र टाईम्सच्याच वेबसाईटवर १ सप्टेंबर रोजी ‘अण्णा हजारेंविषयी खोटी बातमी दिल्याची तक्रार; संपादक गोत्यात, अटकेची शक्यता’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध बातमी देखील मिळाली. या बातमीमध्ये अण्णा हजारे यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
 • लोकपत्रच्या कार्यकारी संपादकांनी सदर बातमीविषयी वृत्तपत्रात जाहीर खुलासा देत दिलगिरी व्यक्त केली आहे.
lokpatra apology
Source: Lokpatra

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अण्णा हजारे यांनी शिक्षकांबद्दल कुठलेही अपमानकारक विधान केलेले नाही. अण्णा हजारेंनी ‘नाहीतरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात’ असं म्हणत शिक्षकांचा अपमान केल्याची बातमी फेक न्यूज आहे.

हेही वाचा- लेकराला रक्तबंबाळ होईपर्यंत मारणाऱ्या महिलेच्या व्हायरल व्हिडीओजचे सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा