गेल्या आठवड्यात 10 जुलै रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राजधानी लखनऊमध्ये “लुलू मॉल”चे (Lulu Mall) उद्घाटन केले. हा भारतातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल असल्याचे सांगितले जातेय. दरम्यान,उद्घाटनानंतर अवघ्या तीनच दिवसांनी लुलू मॉलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही लोक मॉलमध्ये नमाज पठण करत असल्याचे बघायला मिळत होते.
लुलू मॉलमधील नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही हिंदू संघटनांनीही मॉलमध्ये ‘सुंदरकांड’ आणि ‘हनुमान चालीसा’चे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मॉल प्रशासनाकडून याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली. तसेच मॉलमध्ये कुठल्याही प्रकारच्या धार्मिक प्रार्थनांवर बंदी घालण्यात आली.
लुलू मॉल संदर्भातील या वादाच्या संदर्भाने आता सोशल मीडियावर एक प्रेस नोट व्हायरल होतेय. सुशांत गोल्फ सिटी लखनऊ ठाण्याकडून 15 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या या प्रेसनोटच्या आधारे दावा केला जातोय की पोलिसांनी लखनऊमधील लुलू मॉलमध्ये नमाज पठण प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यापैकी तिघे हिंदुधर्मीय आहेत. सरोज नाथ योगी, कृष्ण कुमार पाठक आणि गौरव गोस्वामी हे तिघे मुस्लिम बनून नमाज पठण करत होते.
फेसबुकवर देखील अशाच प्रकारचे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत.
पडताळणी:
गुगलवर किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता ‘मनीकंट्रोल’च्या वेबसाईटवर 16 जुलै रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार सुशांत गोल्फ सिटी पोलिसांनी लुलू मॉलच्या बाहेर कलम 144 उल्लंघन प्रकरणी 15 जणांना ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 15 जणांपैकी सरोज नाथ योगी, कृष्ण कुमार पाठक, गौरव गोस्वामी आणि अरशद अली या चार आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्याचे देखील बातमीत सांगण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले 15 जण लुलू मॉलमध्ये सुंदरकांडच्या पठणासाठी आग्रही होते, असाही उल्लेख बातमीमध्ये बघायला मिळतो.
आम्हाला लखनऊ पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून 18 जुलै रोजी करण्यात आलेले एक ट्विट देखील बघायला मिळाले. या ट्विटमध्ये सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की मॉल व्यवस्थापनाने 14 जुलै रोजी लुलू मॉल परिसरात नमाज अदा केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अद्यापपर्यंत कुठल्याची आरोपीची ओळख पटू शकलेली नाही.
पोलिसांनी 15 जुलै रोजी परवानगी नसताना हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या सरोजनाथ योगी, कृष्ण कुमार पाठक आणि गौरव गोस्वामी या तिघांना अटक केली होती. अशाच प्रकारे नमाज पठणासाठी आग्रही असणाऱ्या अरशद अली याला देखील अटक करण्यात आली आहे. या चारही आरोपींवर सीआरपीसीच्या 151, 107, 116 या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की लखनऊमधील ‘लुलू मॉल’मध्ये नमाज पठण प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हिंदू धर्मीय असल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या हिंदू धर्मीय आरोपींना मॉल परिसरात हनुमान चालीसा आणि मुस्लिम आरोपीस नमाज पठणाचा आग्रह धरण्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. मॉलमध्ये नमाज पठण प्रकरणी अद्यापपर्यंत कुठलाही आरोपी ताब्यात घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा- अमेरिकेने केला भारताचा गौरव? महात्मा बसवेश्वरांचा फोटो १०० डॉलरच्या नोटेवर?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]