पुलित्झर पारितोषिक विजेते फोटो-पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची अफगाणिस्तानातील कंधार येथे तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली. दानिश सिद्दीकी ‘रायटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी अफगाणिस्तान-तालिबान संघर्ष कव्हर करत होते.
दानिश यांच्या मृत्यूनंतर लगेचच उजव्या विचारसरणीच्या ट्रोल्सकडून त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागलंय. सोशल मीडियावर अनेकांनी दावा केलाय की दानिश सिद्दिकींनी कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्काराचे फोटोज विकले आणि त्यातून भरमसाठ पैसे कमावले.
शेफाली वैद्य या सोशल मीडियावर फेक न्यूज पसरविण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’कडून यापूर्वी देखील शेफाली वैद्य यांनी केलेल्या अनेक फेक दाव्यांचं ‘फॅक्ट चेक’ करण्यात आलंय.
शेफाली वैद्य यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत दानिश सिद्दीकी ही तीच व्यक्ती आहे का, ज्या व्यक्तीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पैशासाठी अंत्ययात्रेचे फोटोज विकले होते, असा प्रश्न उपस्थित केलाय.
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून असाच दावा केला होता. नंतर त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं.
पडताळणी:
- भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातलेले असताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे वास्तव दानिश सिद्दीकी यांनी आपल्या फोटोजमधून मांडले होते. हे फोटोज त्यावेळी प्रचंड व्हायरल झाले होते. देशातच नव्हे तर जगभरात या फोटोजची चर्चा झाली होती.
- दानिश सिद्दीकी हे ‘रॉयटर्स’ या आतंरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी ‘फोटो जर्नलिस्ट’ म्हणून काम करत होते. कोरोना व्हायरसची दुसरी लाट देखील ते ‘रायटर्स’साठीच कव्हर करत होते. माध्यमांमध्ये काम करत असताना माध्यमकर्मींकडून कामाचा भाग म्हणून ज्या कुठल्या क्रिएटिव्ह कंटेन्टची निर्मिती केली जाते, त्याच्या व्यावसायिक उपयोगाचे हक्क संबंधित कंपनीकडे असतात.
- दानिश सिद्दिकींनी जे फोटोज घेतले त्याच्या व्यावसायिक उपयोगाचे अधिकार दानिश यांच्याकडे नव्हे, तर त्यांच्या ‘रायटर्स’ या वृत्तसंस्थेकडे होते आणि आहेत. फोटोजची किंमत किती असावी वैगेरे गोष्टी ठरविण्यामध्ये त्यांची कुठलीही भूमिका नव्हती. कामाच्या बदल्यात पगार घेणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याकडे तसे अधिकार नसतात.
- ‘रायटर्स’कडून जगभरातील अनेक छोट्या-मोठ्या माध्यमांना ‘कंटेन्ट’ (बातम्या, फोटो, व्हिडीओ इ.) पुरवले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमसमुहाशी व्यावसायिक करार केले जातात. या करारांतर्गत माध्यमसमूह वृत्तसंस्थेच्या बातम्या किंवा इतरही मजकूर आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरू शकतात. या व्यावसायिक करारामधून मिळणारा लाभ हा थेट त्या संस्थेला होतो.
- स्वतंत्ररित्या काम करणारे पत्रकार थेट माध्यमसंस्थांना आपले फोटोज विकू शकतात. या व्यवहारात फोटोची किंमत ठरविण्यापासूनच्या प्रक्रियेत ते सहभागी असतात. वृत्तसंस्थेसाठी किंवा इतर कुठल्याही माध्यम संस्थेसाठी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या फोटो-पत्रकारांना हे अधिकार नसतात. या प्रक्रियेत ते कुठेही सहभागी नसतात. साहजिकच या व्यवहारातून संस्थेला होणाऱ्या आर्थिक लाभाचे थेट लाभार्थी हे पत्रकार नसतात.
- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्दिकींनी २३००० रुपयांना अंत्यसंस्काराचे फोटोज विक्रीस उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यासाठी जे फोटोज शेअर केले जाताहेत, त्या फोटोजचा सिद्दीकी यांच्याशी काहीही संबंध नाही. हे फोटोज ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेसाठी मनी शर्मा (Money Sharma) यांनी घेतले होते. फोटोचे क्रेडिट्स मनी शर्मा यांनाच देण्यात आले आहेत. दानिश सिद्दीकी ‘एएफपी’साठी नाही, तर ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेसाठी काम करायचे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की तालिबान्यांकडून भारतीय फोटो-पत्रकार दानिश सिद्दीकी यांनी कोरोना मृतांच्या अंत्यसंस्काराचे फोटोज पाश्चिमात्य माध्यमांना विकल्याचे दावे चुकीचे आहेत.
सिद्दीकी यांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले म्हणून जे फोटोज शेअर केले जाताहेत, ते फोटोज सिद्दीकी यांनी घेतले नव्हते. सदर फोटोज ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेसाठी मनी शर्मा यांनी घेतले होते.
हेही वाचा- भाजप राजवटीतीलच हिंसक मुलींच्या जमावाचा फोटो ‘काँग्रेस का कश्मीर’ म्हणून व्हायरल!
Be First to Comment