सध्या सोशल मिडीयात २२ वर्षीय प्रताप एम.एन. (Pratap m n) नामक युवा ड्रोन वैज्ञानिकाचे फोटोज व्हायरल होताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या युवा वैज्ञानिकाची डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केल्याचा दावा देखील फोटोज सोबत व्हायरल होतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीआरडीओमध्ये नियुक्त केलेल्या २१ वर्षीय शास्त्रज्ञ प्रताप यांची रंजक कहाणी-
हे २१ वर्षीय प्रताप आहेत. प्रताप महिन्यातून २८ दिवस विदेश यात्रा करतात. त्यांच्याकडे फ्रांसमधून मासिक १६ लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर आहे. इतर सुविधांमध्ये ५ बीएचके आणि अडीच कोटींची गाडी’
अशा दाव्याचं ट्वीट अमितसिंग राजावत या ट्वीटर युजरने केलंय.
अमितसिंग यांचं ट्वीट जवळपास १७ हजार जणांनी रीट्वीट केलंय. रीट्वीट करणाऱ्यांमध्ये माजी खासदार आणि गोवा भाजपचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावईकर यांचा देखील समावेश आहे.
ड्रोन वैज्ञानिक म्हणून प्रताप यांनी मिळवलेलं यश आणि आणि त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्याची प्रेरणादायी कहाणी सांगणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरताहेत.
हेच दावे लांबलचक मेसेजच्या स्वरुपात व्हॉट्सऍपवर नव्याने व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शेखर वाघ, अशोक उरुणकर, सुरेश गांधी आणि संजय मिस्त्री यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
प्रताप एम.एन (Pratap m n) यांच्याविषयी केल्या जाणाऱ्या दाव्यांची पडताळणी सुरु केली असता आम्हाला ‘डेक्कन हेराल्ड’च्या वेबसाईटवर प्रतापविषयी एक लेख वाचायला मिळाला.
‘डेक्कन हेराल्ड’नुसार प्रताप कर्नाटकमधील मंड्या येथील रहिवासी असून सध्या बंगळूरूमधील कंपनी ‘एयरोव्हेल स्पेस एंड टेक’मध्ये कार्यरत आहेत. गतवर्षी कर्नाटकमध्ये आलेल्या महापुरात प्रतापने बनवलेल्या ड्रोनच्या मदतीने अनेकांचा जीव वाचवता आला होता.
प्रताप यांची खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे का, हे शोधत असताना आम्हाला बूम लाईव्हवर एक लेख मिळाला. त्यानुसार आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशी कोणतीही नियुक्ती मिळालेली नाही, हे प्रताप यांनी बूम लाईव्हशी बोलताना स्पष्ट केले आहे.
दरम्यान, फ्रान्समधील नोकरी आणि इतर सुविधांविषयीचे दावे मात्र खरे असल्याचे प्रताप यांनी सांगितले आहे. फ्रांसमधील नोकरीचा प्रस्ताव आपण नाकारला कारण आपल्याला बंगळूरूमध्येच लॅब सेट अप करायची असल्याचं देखील प्रताप यांनी सांगितलं आहे.
त्यानंतर आम्ही डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्तीसाठी अत्यावश्यक पात्रता काय हे शोधले, त्यावेळी आम्हाला डीआरडीओच्या वेबसाईटवरती यासंबंधी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्तीसाठी मास्टर्स डिग्री आवश्यक आहे. प्रताप यांचं सध्या तरी मास्टर्स पूर्ण नाही. त्यामुळे नियमांनुसार डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्तीसाठी ते पात्र नाहीत.
वस्तुस्थिती:
केवळ २२ वर्षीय प्रताप यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. त्यांच्या संदर्भात सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले काही दावे खरे देखील आहेत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रताप यांची डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केल्याचा दावा मात्र खोटा असल्याचं आमच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा- ‘सायकल गर्ल’ ज्योती पासवान सुखरूप, हत्या आणि बलात्काराचे दावे चुकीचे !
Be First to Comment