बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने ‘कोरोनील’ नावाची औषधी धूमधडाक्यात लॉंच केली आणि त्याच दिवशी आयुष मंत्रालयाने त्यावर बंदी आणत काही आक्षेप घेतले. या घडामोडी सर्व माध्यमांनी आपल्यापर्यंत पोहचवल्या होत्याच. त्यानंतर जसजशा विविध बातम्या समोर येऊ लागल्या तसं पतंजली आयुर्वेदचे CEO असणाऱ्या आचार्य बाळकृष्ण यांनी ३० जून रोजी घुमजाव केलं.
ANI सोबत बोलताना बाळकृष्ण म्हणाले ‘आम्ही असं कधी म्हणालोच नव्हतो की आमच्या औषधाने कोरोना बरा होतो किंवा आटोक्यात येतो. आम्ही असं म्हणलो की आम्ही औषधी बनवली आणि तिची क्लिनिकल टेस्ट घेतली तेव्हा त्यात कोरोना रुग्ण बरे झाले. आमच्या बोलण्यात कुठेही संभ्रम नाहीये.’
अमर उजाला सोबत बोलताना बाळकृष्ण यांनी पतंजलीवर होणारे सर्व आरोप धुडकावून लावले आणि ‘सर्व काही क्लीअर आहे. आम्ही रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लायसन्स घेतलं आणि त्याचंच औषध बनवलं यात कुठेही कोरोनाचा संबंध नाही. ना आम्ही असा कुठे दावा केलाय ना आम्ही अशा जाहिराती दिल्या की ज्यात लिहिलं असेल ही औषधं कोरोनाची आहेत. आम्ही केवळ एवढीच माहिती शेअर केली की या औषधांची क्लिनिकल ट्रायल घेतली तेव्हा त्यात कोरोना रुग्ण बरे झाले. आम्ही स्वतः कधी ते औषध कोरोनावर उपाय असल्याचं सांगितलंच नव्हतं.’
पडताळणी:
बाबा रामदेव यांनी भर प्रेस कॉन्फरन्समध्ये या औषधांनी कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा दावा केल्याचं सर्वांनी पाहिलं होतं. आता आचार्य बाळकृष्ण यांनी केलेल्या वक्तव्याच्या बातम्या देतानाही अनेक माध्यमांनी ‘घुमजाव’ असा शब्दप्रयोग केलाय.
म्हणूनच ‘चेकपोस्ट मराठी’ने पतंजली आयुर्वेदने औषधींबद्दल काय काय दावे केले होते याची पुराव्यानिशी पडताळणी करण्याचे ठरवले.
- प्रवक्त्याच्या माहितीमध्ये दावा:
बाबा रामदेव यांचे प्रवक्ता तिजारवाला यांनी ट्विट करून २३ तारखेच्या पत्रकार परिषदेची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी शेवटच्या वाक्यात असं लिहलंय की ‘बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण कोरोना व्हायरस बरा करणाच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देणार आहेत’
- पत्रकार परिषदेतील दावा:
२३ जून २०२० रोजी पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे घेतलेली पत्रकार परिषद सर्वच वाहिन्यांनी दाखवली होती. खाली दिलेल्या झी २४ तासच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये ६.२८ मिनिटांपासून पुढे आपण पाहू शकता की बाबा रामदेव म्हणत आहेत “आज हम ये कहते हुए फक्र है, औषधी कोरोना का पेहला आयुर्वेदिक ट्रीटमेंट. धिस इज नॉट ओन्ली कंट्रोल, क्योर है. ये केहते हुये हमें फक्र है की इसमे १००% रिकव्हरी रेट है विदिन सेव्हन डेज और झिरो परसेंट डेथ रेट है ये भी बडी बात है!”
- अधिकृत ट्विटर हँडलवरून दावा:
पतंजली आयुर्वेदच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २३ जून रोजीच एक ट्विट करण्यात आलं होतं. यामध्ये कार्यक्रमाच्या व्हिडीओची लिंक शेअर करून असं लिहिलंय की ‘ जर यदाकदाचित आपण आजचा पूज्य योगी श्री रामदेव आणि पूज्य आचार्य बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेल्या कोव्हीड१९ वरील औषधीचा लॉंच कार्यक्रम पाहू शकला नसाल तर येथे पाहू शकता.’
(युट्युबने आपल्या पॉलिसीजची कारणे देत हा व्हिडीओ काढून टाकला आहे.)
- डिलीट केलेलं ट्विट:
पतंजली आयुर्वेदच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २३ जूनला एक ट्विट केलं होतं परंतु नंतर ते डिलीटकरण्यात आलं. हे ट्विट आम्हाला अर्काइव्ह साईटवर सापडलं. यामध्ये ‘कोव्हीड१९ वरील सर्वात पहिल्या पुराव्याधारित आयुर्वेदिक औषधाचे लॉंच झाले’ अशी माहिती देण्यात आली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती देणारे प्रवक्ता तिजारवाला यांचे ट्विट, बाबा रामदेव यांचे परिषदेतील वक्तव्य, कार्यक्रम झाला असून आपण त्याचा व्हिडीओ या लिंकवर जाऊन पाहू शकता सांगणारे पतंजली आयुर्वेदचे अधिकृत ट्विट आणि त्यांचेच डिलीट केले गेलेले ट्विट या प्रत्येक ठिकाणी हेच आढळले की पतंजली आयुर्वेद मार्फत तयार करण्यात आलेल्या औषधी कोव्हीड१९ बरा करू शकतात असे दावे केले आहेत.
त्यामुळे पतंजली आयुर्वेदचे CEO आचार्य बाळकृष्ण यांनी ANI आणि अमर उजाला सोबत बोलताना ढळढळीतपणे घुमजाव करत खोटी माहिती दिल्याचं सिद्ध झालंय.
हेही वाचा: रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ औषधीला मान्यता मिळाल्याचा व्हायरल दावा फेक!
Be First to Comment