Press "Enter" to skip to content

ग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी!

ग्रहणाच्या काळात गर्भवती स्त्रियांनी काय करावं आणि काय करू नये, यासंबंधीचे अनेक दावे-प्रतिदावे प्रत्येक ग्रहणाच्या वेळी फिरत असतात. मिडिया आणि सोशल मिडिया दोन्हीवरही या गोष्टी पसरत आसतात. आजच्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने अशाच दाव्यांची तथ्य तपासणी.

Advertisement

पाहूया एकेक दावा आणि त्यामागची वस्तुस्थिती-

  • दावा: ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर जाऊ नये, सूर्याकडे पाहू नये.
pregnant lady in sun rays
फोटो प्रतीकात्मक

वस्तुस्थिती: उघड्या डोळ्यांनी जर ग्रहण पाहिले तर डोळ्यांना इजा होऊ शकते. हे मत एकूणच सर्वांसाठी लागू होते. परंतु खासकरून गर्भवती स्त्रियांनी बाहेर पडू नये आणि सूर्यग्रहण पाहू नये यामागे कुठेलेही वैज्ञानिक पुरावे नाहीत उलट नासाने तर असं सांगितलंय की गर्भवती स्त्रियांवर, त्यांच्या बाळावर ग्रहण पाहिल्यास कुठलाही परिणाम होत नाही.

  • दावा: ग्रहणाच्या काळात शिजवलेलं अन्न खराब होतं. त्यामुळे काहीही खाऊ पिऊ नये.

वस्तुस्थिती: नासाचाच रिपोर्ट असं सांगतो की जर हा समज प्रमाण मानायचा ठरवला तर शिजवलेलंच कशाला घरातील इतर साठवलेलं, अन्नधान्यांच्या कोठारातलं किंवा शेतातलं सुद्धा अन्न खराब झालं असतं. केवळ माणसाच्याया मनातील भीतीमधून या अशा गोष्टी तयार झाल्या आहेत. त्यामुळे ग्रहण काळात अन्न खराब होण्याच्या दाव्यात अजिबात तथ्य नाही.

उलट गर्भवतींनी फार काळ अन्नपाण्याविना राहणं अपायकारक आहे. यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते, पूरक अन्न नाही मिळालं तर चक्कर येऊ शकते.

दावा: ग्रहण काळात धारधार वस्तूंनी काही कापलं चिरलं तर मुल कापलेल्या ओठांचे जन्मू शकते.

वस्तुस्थिती: जन्मतःच बाळाचे ओठ दुभंगलेले असण्याचा ग्रहणाशी अजिबात संबंध नाही.

‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ (CDC) या अमेरिकन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आईचा गर्भावस्थेत धुम्रपानाशी सबंध आला, किंवा तिला गर्भधारणे आधी डायबेटीस असेल तर हे होऊ शकतं. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात अपस्मार फेफरे यांसारख्या समस्यांमुळे जर topiramate किंवा valproic acid ही औषधं पोटात गेली तर बाळाचे ओठ जन्मतः दुभंगलेले असू शकतात.

  • दावा: ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी झोपू नये. त्याने मुल अंध किंवा नेत्रदोषांसह जन्मू शकते.

वस्तुस्थिती: ग्रहणाचा गर्भावर काही परिणाम होत असण्याच्या दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. बाळात नेत्रदोष असण्याचे इतर अनेक वैद्यकीय कारणं असू शकतात असं NCBIच्या रिसर्च पेपरमध्ये सांगण्यात आलंय; परंतु यात कुठेही ग्रहणाचा संबंध असल्याचं सांगितलेलं नाही.

उलट गर्भवती महिलेला पुरेशी झोप, आराम मिळणे अत्यावश्यक आहे.

  • दावा: ग्रहणकाळ चालू होण्याआधी आणि नंतर अंघोळ करणं गरजेचं आहे.

वस्तुस्थिती: ग्रहणाचा संबंध शकून अपशकुनाशी लावून हे सर्व दावे केले जातात. आपल्या अंघोळीचा किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यातील बऱ्यावाईट घटनांचा ग्रहनाशी तिळमात्र संबंध नाही.

मानवी मनाला दोन वेगवेगळ्या गोष्टीचा संबंध लावण्याची सवय असते. अनपेक्षित, चुकीच्या वाईट घटनांचा संबंध तो कुठल्यातरी दिवसाशी जोडत असतो. जर ग्रहण काळ अपशकुनीच आहे तर त्याचा प्रकोप सर्वांवर व्हायला हवा. या काळात आनंदी, चांगल्या, हितकारक अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्यांचं काय?

नासाने या अशा दाव्यांना सुद्धा निखालस खोटे आणि तर्कहीन मानले आहे.

अमेरिकेच्या ‘एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रानुसार ग्रहणाबद्दलच्या या सर्व धारणा मेक्सिकन आणि हिंदू ज्योतिष शास्त्रांतच जास्त पहायला मिळतात. या सर्वांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.

चेकपोस्ट मराठीने या सर्व दाव्यांची पडताळणी केली असता या दाव्यांत अंधश्रद्धा सोडली तर इतर काहीच तथ्य आढळले नाही. या अंधश्रद्धा पाळताना स्वतःला आणि गर्भातल्या बाळाला त्रास होण्याच्याच शक्यता जास्त आहेत. गरजेनुसार पोषक आहार, वेळोवेळी सोनोग्राफी परीक्षण आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे पूर्ण नऊ महिने सल्ले सुदृढ बालकासाठी पुरेसे आहेत.

हेही वाचा: होंडा कंपनी फ्रीमध्ये ऍक्टिवा वाटतेय असा मेसेज तुम्हाला आलाय? मग हे नक्की वाचा

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा