Press "Enter" to skip to content

केजरीवाल, राहुल गांधींना सेल्समन म्हणत तिसरी लाट ‘फायजर’ची खेळी सांगणाऱ्या दाव्याची झाडाझडती!

‘आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक’ असा स्वतःचा परिचय स्वतःच करून देत असलेल्या ‘चंद्रशेखर नेने’ यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओत नेने कोरोना व्हायरस हे एक अतिशय भीषण षडयंत्र असल्याचं सांगताहेत. शिवाय नेने यांनी प्रचारकी थाटात कोरोनाच्या संदर्भात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिलीये आणि राहुल गांधी, अरविंद केजरीवाल या विरोधी पक्ष नेत्यांना ‘फायजर’ (pfizer)या अमेरिकन वैद्यकीय कंपनीचे ‘सेल्समन’ घोषित केलंय.

Advertisement

फायझर कंपनीचे षडयंत्र उघडकीस. तिसरी लाट वगैरे काही नाही. कृपया वेळ काढून जरुर पहा.

Posted by Varsha Thakar on Tuesday, 8 June 2021

नेनेंचा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यानंतर त्यांचा कोरोना, फायजरची लस आणि कोरोनाची तिसरी लाट याविषयीचा ‘अभ्यास’ (?) मात्र कमी पडला असल्याचं आमच्या लक्षात आलं. किंबहुना स्वतःच ‘आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक’ असल्याने त्यांना वेगळ्या अभ्यासाची गरज देखील भासली नसावी. मात्र, नेनेंनी कुठल्याही अभ्यासाशिवाय कोरोनाविषयीचे जे उपदेशाचे निराधार डोस श्रोत्यांना दिलेत, त्यामुळे लोकांचा अजूनच गोंधळ उडतोय. यास्तव नेनेंच्या दाव्यांची ही उलटतपासणी!

दावा- फायजरला परवानगी नाकारत सरकारने फायजरचा वसाहतवाद धुडकावला

व्हिडिओमध्ये नेने म्हणतात, “फायजरची लस घेतल्यानंतर भारतीय नागरिकांवर काही दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी फायजर घेणार का? अशी विचारणा फायजरकडे करण्यात आली, त्याला फायजरने नकार दिला. आम्ही असली जबाबदारी वैगेरे घेत नाही, आमचं वॅक्सीन उत्तमच आहे. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, अशा प्रकारचा वसाहतवादी दृष्टिकोन फायजरने भारताबद्दल वापरला. भारत ब्रिटन किंवा अमेरिकेची वसाहत नाही आणि आताचं सरकार तर निश्चितच नाही. त्यामुळे सरकारने फायजरला सांगितलं की आम्हाला तुमचं वॅक्सीन नको.”

फायजरला आपत्कालीन वापराची परवानगी नाकारून जणू काही भारत सरकारने कुठला पराक्रमच केला अशा थाटात नेने हा सगळा घटनाक्रम सांगताहेत. शिवाय सरकारची बाजू पटवून देण्यासाठी ते ह्या सगळ्या घटनाक्रमाचं अतिशय सवंग सुलभीकरण करताहेत. विशेष म्हणजे हे सगळं घडत असताना आपण तिथे उपस्थित असल्याच्या अविर्भावात अतिशय रंगवून हा किस्सा सांगताहेत, हे वेगळंच.

वस्तुस्थिती:

हे खरंय की फायजरकडून भारतात आपत्कालीन वापराची परवानगी मागण्यात आली होती. जगभरातील अनेक देशांनी फायजरच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिलेली असल्याने भारताने देखील ती द्यावी, असं फायजरचं म्हणणं होतं. तर भारत सरकार मात्र स्थानिक पातळीवर ट्रायलसाठी आग्रही होतं. याबाबतीत एकमत होतं नसल्याने भारताने फायजरला परवानगी नाकारली आणि त्यानंतर फायजरने परवानगीसाठीची विनंती मागे घेतली.

सरकारच्या या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यावेळी देखील नाराजी व्यक्त केली होती. नुकतेच निधन झालेले इंडियन मेडिकल असोशिएशनचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के.के. अग्रवाल यांनी देखील व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी आश्चर्य व्यक्त केलं होतं. फायजरची लस जगभरात लसीकरणासाठी वापरण्यात येत आहे. जगभरातील भारतीयांना देखील ती देण्यात आलेली आहेच. अशा स्थितीत जगभरातील भारतीयांवर, भारतीय वंशाच्या लोकांवर या लसीचा काय परिणाम झाला, याचा अभ्यास करून लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याविषयीचा निर्णय घ्यायला हवा होता, असं के.के. अग्रवाल यांनी म्हंटलं होतं.

के.के. अग्रवाल यांचा सल्ला तर्काला धरून आहे कारण जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय वंशाची लोकं राहतात. त्यांच्यावर ‘फायजर’च्या लसीचा काय परिणाम झाला, याचा अभ्यास करून फायजरची लस घ्यायची किंवा याबाबतचा निर्णय घेता आला असता आणि कदाचित देशाला लसीच्या टंचाईला सामोरे जायला लागलं नसतं.

आता सरकारची स्वतःहून फायजरला विनंती

फायजरला आपत्कालीन वापराची परवानगी नाकारणं, हे आपल्या चुकलेल्या लसीकरण धोरणातलं पाऊल ठरल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय. बहुतेक, सरकारला देखील याची जाणीव झाली असावी. त्यामुळेच सरकारने आता नव्याने फायजर आणि मॉडेर्ना या दोन्ही कंपन्यांशी बोलणी सुरु केली आहे. कदाचित लवकरच भारत फायजरकडून लस विकत घेऊ शकतो. कदाचित, येत्या काही दिवसांमध्ये भारताच्या लसीकरण कार्यक्रमात आपल्याला फायजरच्या लसींचा वापर होताना बघायला मिळू शकतो.

विशेष उल्लेखनीय बाब अशी की अजूनतरी फायजरने भारतात ट्रायल्ससाठी सहमती दर्शविलेली नाही. अशा परिस्थितीत स्थानिक ट्रायल्स न करता फायजरकडून लसींची खरेदी, हे नेने म्हणतात त्याप्रमाणे फायजरचा वसाहतवाद स्वीकारणं ठरतं का? याचं उत्तर कदाचित नेनेच देऊ शकतील.

कोरोना षडयंत्र? तिसरी लाट नाही?

नेनेंनी आपला बराचसा वेळ कोरोनाची तिसरी लाट, तिचा लहान मुलांशी असलेला संबंध आणि फायजर अशी साखळी तयार करण्यात घालवला आहे. सारांश असा की नेने दावा करताहेत की तिसरी लाट वैगेरे काही नाही. फायजरनेच या संबंधीच्या बातम्या पेरल्या असून मोदी सरकारला कमजोर करून फायजरची लस विकण्यासाठी हा सगळा घाट घातला जातोय. त्यात राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल त्यांना मदत करताहेत.

तिसरी लाट आणि तिचा मुलांशी असणारा संबंध याबाबतीत कुठलाही पुरावा दिला जात नाही, असा आक्षेप नेने नोंदवताहेत. हा आक्षेप अगदी तार्किक वाटत असला, तरी ती येणारच नाही, यासाठी तरी नेने कुठे पुरावे देताहेत का?

कोरोना षडयंत्र असल्याचा दावा करणारे नेने आपल्या दाव्यांच्या समर्थनात कुठलेही पुरावे देत नाहीत. कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही आणि आलीच तर त्यामुळे सर्वाधिक धोका लहान मुलांना असणार का, हे आजघडीला कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. ती नाही आली तर उत्तमच. ती येऊच नये, अशीच आपल्या सर्वांची अपेक्षा. मात्र तिसरी लाट आलीच तर त्यादृष्टीने तयार नको राहायला?

शहाणपण यातच की आपण त्यादृष्टीने तयार रहायला हवं. गाफीलपणाचे काय परिणाम उदभवू शकतात, हे आपण दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने अनुभवून झालंय. त्यामुळे आता पुन्हा त्याच दगडाला ठोकर न खाणं, हेच शहाणपणाचं. तुम्हाला नकोय फायजर तर नका घेऊ फायजरची लस, पण त्याची पर्यायी व्यवस्था नको का करायला?

मला असं वाटत नाही की तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना स्पेशल त्रास होणारे’ असं विधान एका ठिकाणी नेने करतात. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही आहात कोण नेने? तुमच्या वाटण्याला काय अर्थ आणि काय आधार? तुम्हाला काय वाटतं हे विचारात घेऊन कोविडचा विषाणू आपली वर्तवणूक बदलतो का?

अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी फायजरचे सेल्समन?

अनेक गोष्टींसाठी पुरावे मागणारे नेने राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जे बेछूट आरोप करताहेत, त्यासाठी तरी त्यांच्याकडे नेमके कुठले पुरावे आहेत? हे पुरावे नेने सरकारकडे सुपूर्द करून केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्या विरोधात खटला का नाही दाखल करत? देशवासीयांची एवढी काळजी वाहणारे नेने ‘जनहितार्थ’ एवढं तरी निश्चितच करू शकतात. बाकी, दुसरी लाट का आली, हे जगाने सांगून झालंय. आता ते तुमच्या काना-डोळ्यांना ऐकायचं आणि बघायचं नसेल, तर हा जगाचा दोष कसा हो नेने?

इम्युनिटी बूस्टर फेल गेलं, म्हणून व्हॅक्सीनची जाहिरात!

व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात नेने सांगतात की ‘इम्यूनिटी बूस्टर फेल गेलं म्हणून आता व्हॅक्सीनची जाहिरात केली जातेय’ केजरीवाल आणि राहुल गांधी फायजरचा झेंडा घेऊन उभे आहेत. मात्र राहुल गांधी किंवा केजरीवालांनी फायजरच्या लसीची जाहिरात कधी आणि कुठे केली, हे मात्र ते सांगत नाहीत. त्यासाठी कुठले पुरावे देत नाहीत. बोलाचीच कढी, बोलाचाच भात.

जाहिरातीचा एवढा त्रास असणारे नेने एक लबाडी मात्र करतात. ‘इम्युनिटी बूस्टर’ फेल असल्याचा दावा करणारे नेने अशाच प्रकारच्या इम्युनिटी बुस्टरची निर्मिती करणाऱ्या रामदेव बाबा विषयी आणि त्याची जाहिरात करणारे देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याविषयी मात्र चकार शब्द देखील काढत नाहीत.

नेनेंच्या बिनबुडाच्या दाव्यांना प्रसिद्धी देणारे कोण?

चंद्रशेखर नेने यांनी तथ्यहीन बेछूट दाव्यांच्या, आरोपांच्या फैरी झाडल्या. या दाव्यांसाठी त्यांना व्यासपीठ कुणी उपलब्ध करून दिले आहे हे समजले तरी या सर्व दाव्यांची, सरकार धार्जिणे असण्याची आणि केजरीवाल-गांधींना विना पुरावा सेल्समन संबोधण्याची उर्मी कशी आली हे कळेल. व्हिडीओतच नेनेंच्या मागे असलेल्या बॅनरवर ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राचे नाव आहे; हे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे मुखपत्र संबोधले जाते.

चंद्रशेखर नेने यांच्या विविध दाव्यांतून एवढंच सिद्ध होतं की स्वतःस ‘आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक’ म्हणवून घेताना आपल्या प्रत्येक दाव्याला तर्काची आणि सबळ पुराव्यांची जोड असायल हवी हे ते विसरले. त्यांच्या संपूर्ण व्हिडिओत ते विश्लेषक किंवा अभ्यासक कमी सरकारच्या संरक्षणात उतरलेले समर्थक अधिक वाटतात. या अशा दाव्यांना जीवन-मृत्यूचा खेळ बनलेल्या कोरोनाबद्दल किती गांभीर्याने घ्यायचं हे सुज्ञ वाचकांनी ठरवलेलंच बरं.

हे ही वाचा- मोदींच्या ‘एनिमी प्रॉपर्टी कायद्या’मुळे सोनिया गांधी आणि राजा महमुदाबादचा डाव फसला?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा