Press "Enter" to skip to content

लता मंगेशकरांच्या पार्थिव देहावर शाहरुख खान थुंकला? वाचा व्हायरल दाव्यांचे सत्य!

भारताची गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे ६ फेब्रुवारी रोजी देहावसान झाले. त्यांच्या अंतिम दर्शनास गेलेला शाहरुख खान (Shah rukh khan) मास्क खाली करून त्यांच्या पार्थिवावर थुंकला असे दावे जोरदार व्हायरल होतायेत.

Advertisement

हरियाणा भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अरुण यादव यांनी शाहरुखचा तो व्हिडीओ ट्विट करत ‘क्या इसने थुका है?‘ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओस साडेतीन हजार लोकांनी रीट्विट केलेय.

असेच दावे मराठीतूनही जोरदार व्हायरल होतायेत.

फेसबुक, ट्विटर प्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रकाशभाऊ जगताप, निलेश मालानी, कैलास ढवळे, यश गोखले आणि डॉ. राहुल पाटील यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांविषयी शोधशोध केली असता सदर प्रकरणावर सोशल मीडियात दोन गट पडल्याचे दिसले. एका गटाकडून शाहरुख थुंकला असा दावा होतोय तर एका गटाकडून फुंकर मारली असा दावा होतोय. फुंकर मारण्याच्या दाव्याला मुस्लीम रिती रिवाजाचे दाखले दिले गेले आहेत.
  • यात किती तथ्य आहे हे आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुस्लीम धर्मात प्रार्थना म्हणजेच फातेहा पढल्यानंतर ती प्रार्थना ती दुआ इच्छित व्यक्ती, पदार्थ किंवा वस्तूला पोहचण्यासाठी त्यावर फुंकर मारली जाते असे समजले यास ‘दम’ असे म्हणतात.
  • मागच्या काही काळात मुस्लीम मौलवी अन्नावर थुंकत असल्याचे दावे करत काही व्हिडीओज व्हायरल झाले होते. त्यावेळीही ‘चेकपोस्ट मराठी’ने ते थुंकत नसून फुंकर मारत असल्याचे स्पष्ट केले होते. ती बातमी आपण ‘येथे‘ वाचू शकता.
  • सुन्नी मुस्लीम धर्मातील सर्वात महत्वाच्या मानल्या गेलेल्या ग्रंथांपैकी एक म्हणजे ‘साहीह मुस्लीम‘ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादातील निवडक परिच्छेद ‘इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी मलेशिया’च्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. यामध्ये पुस्तक क्रमांक २६, पाठ १९ वा, पृष्ठ क्रमांक ५४३९ वर एक वाक्य आहे. ‘आयशाने सांगितले, जेव्हा घरातील कुणी आजारी पडतो तेव्हा अल्लाहचा दूत येऊन मुआविधातन म्हणजे प्रार्थना करून फुंकर मारत असे. त्याच आजारात जर त्याचा मृत्यू झाला तर अल्लाहचा दूत त्यावर फुंकर मारतो, त्याच्या देहास स्वताच्या हाताने चोळतो कारण त्याच्या हातात दाह कमी करण्याची ताकत येते.’
  • मुस्लीम रीतीरिवाज एकवेळ बाजूला ठेऊन काहीसा तार्किक विचार केला तरीही हे लक्षात यायला हवं की एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर, माध्यमांसमोर, सर्वांचे लक्ष आपल्या कृतीकडे असण्याची जाणीव असताना एखाद्या व्यक्तीच्या पार्थिव देहावर थुंकण्याची हिम्मत तरी कशी करेल?

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट होतेय की अभिनेता शाहरुख खान लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर थुंकला नाही. त्याने फातिहा पढला, मास्क खाली केला आणि पार्थिव देहावर फुंकर मारली. व्हायरल दावे फेक आहेत.

हेही वाचा: टोस्टला थुंकी लावणारा व्हायरल व्हिडीओतील बेकरी कामगार ‘आदिल’ पोलिसांच्या ताब्यात? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा