Press "Enter" to skip to content

शिवसेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी कंगनाने घेतला ‘फेकन्यूज’चा आधार!

शिवसेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावतने एका बातमीची लिंक शेअर करताना पुन्हा एकदा शिवसेनेचा उल्लेख ‘सोनिया सेना’ असा केलाय. शिवाय फेसबुकने mark yourself safe from shivsena goons अर्थात शिवसेनेच्या गुंडांपासून स्वतःला सुरक्षित मार्क करण्याची सुविधा सुरु केली असल्याचा दावा केलाय. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कंगनाने ‘द फ्रॉक्सी’ या न्यूज पोर्टलची एक बातमी रिट्विट केलीये.

‘द फ्रॉक्सी’चं ट्विट रिट्विट करताना कंगनाने म्हटलंय:

Advertisement

‘धन्यवाद फेसबुक, लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे, कोविड -१९च्या विषाणूसारख्या ‘सोनिया सेने’च्या गुंडांपासून लोकांचे रक्षण होणे आवश्यक आहे. चांगल्या आणि विचारप्रवर्तक कामाबद्दल धन्यवाद!’

अर्काईव्ह लिंक

बातमी करेपर्यंत या ट्विटला रीट्विट करणारे जवळपास ८ हजारच्यावर लोक होते तर अनेकांनी कंगनाला ट्रोल करत कमेंट करत रीट्विट केले त्यांची संख्या हजारच्या घरात होती. या ट्विटला ‘लाईक’ करणारे तब्बल सत्तेचाळीस हजार युजर असल्याचे दिसले.

पडताळणी:

विषयाची पडताळणी करण्याआधी आपणास ‘Marked Safe’ हे फेसबुकचं नेमकं काय फिचर आहे हे समजून घ्यावं लागेल.

काय आहे ‘मार्क्ड सेफ’ फिचर?

फेसबुकवर ‘Crisis Response‘ नावाचे फिचर आहे. त्यात जगभरात घडणाऱ्या विविध आपत्तींविषयी माहिती असते. जसे की पूर परिस्थिती, चक्रीवादळ, ज्वालामुखीचा उद्रेक, आग, वणवा किंवा अगदी इमारत कोसळणे अशा निसर्ग अथवा मानवनिर्मित आपत्ती ज्यात जीवितहानी होण्याचा धोका असतो. अशा आपत्तीमधून आपण बचावलो असे आपल्या फेसबुक मित्रांना आप्तेष्टांना कळवण्यासाठी आपण हे ‘‘मार्क्ड सेफ’चे स्टेट्स ठेऊ शकतो.

यामुळे आपल्या मित्रांना आपण सुखरूप असण्याची माहिती कळेल किंवा अडचणीत असू तर मदत मागता येईल. असा एकूण या फिचरचा उद्देश आहे.

हा उद्देश ज्यास माहितीय त्याला चटकन अंदाज लागेल की ‘शिवसेनेच्या गुंडांपासून वाचलो’ वगैरे सांगणारे फिचर तयार करून फेसबुक कशाला राजकीय रोष ओढवून घेईल. याच अनुषंगाने आम्ही पडताळणी सुरु केली.

कंगनाने शेअर केलेले ट्विट:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी कंगनाने शेअर केलेले ट्विट तपासून पाहिले. त्यात बातमीची लिंक शेअर करत फेसबुकने mark yourself safe from shivsena goons अर्थात ‘शिवसेनेच्या गुंडांपासून बचावलो’ असे स्टेट्स ठेवण्याची सुविधा दिली असल्याचे म्हंटले होते.

परंतु याच्या बायोमध्ये ‘द फॉक्सी’ बद्दल लिहिताना त्यांनी हे ‘fictitious’ म्हणजे काल्पनिक असल्याचे सांगितले आहे. याविषयी खात्री करण्यासाठी आम्ही लिंकवर क्लिक करून थेट वेबसाईटवर पोहचलो.

‘द फॉक्सी’चे ‘डिस्क्लेमर’:

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल सैनिकास मारहाण केल्याने स्वतःच्या पद्धतीने निषेध नोंदवणारी बातमी करत ‘द फॉक्सी’ने फेसबुकवर ‘शिवसेना गुंडांपासून वाचलो म्हणून स्टेट्स’ ठेवण्याचे फिचर उपलब्ध केलेय, जवळपास शिवसेनेचा गुंड असल्यास ‘आरोग्य सेतू’ ऍपवर समजणार, ‘गुगल मॅप’वर शिवसेना गुंडांचे ऑफिस टाळता येईल असे मार्ग दाखवले जाणार असे सांगत बातमी केलीय.

परंतु याच साईटबद्दल अधिक माहिती घेताना त्यांचे ‘अबाउट अस’ आणि ‘डिस्क्लेमर‘ असे दोन सेक्शन आम्हाला सापडले. ‘अबाउट अस’ मध्ये माहिती देताना कंसात LOL म्हणजे उपहासाने हसल्याचे दाखवत ‘हे निर्भय पत्रकारीतेचं, विचारप्रवृत्त करणाऱ्या विनोदाचं आणि प्रभावी कथाकथनाचं पोर्टल’ असल्याचं लिहिलंय.

‘डिस्क्लेमर’ म्हणजे सावधगिरीचा ईशारा देत ते म्हणतायेत ”द फॉक्सी’ हे उपहासात्मक बातम्यांचं पोर्टल आहे. या वेबसाईटवरील मजकूर काल्पनिक आहे. वाचकांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी द फॉक्सी वरील आर्टिकल्स वाचून हे अधिकृत आणि खरे असल्याचा गैरसमज करून घेऊ नये.’

thefauxy disclaimer and about us content checkpost marathi
Source: The Fauxy

ही ‘फेकन्यूज’ असल्याचे समजल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया:

ही अशी फेक बातमी खरी मानून शेअर केल्याने अनेकांनी कंगनाला ट्रोल केले. फ्री प्रेस जर्नलने या ट्रोलिंगची बातमी केली. आपण ‘फेकन्युज’ला खरे मानून शेअर केलेय हे समजून, आपली चूक लक्षात आल्यावर कंगनाने त्यावर दिलगिरी व्यक्त करायचे सोडून, आधीचे ट्विट डिलीट न करता उलट या बातमीला रिप्लाय देत ‘ज्या ट्विटर अकाऊंटचे ट्विट मी रीट्विट केले त्यांनी ते ‘काल्पनिक आणि उपहासात्मक’ असल्याचे सांगितलेय.

याचा अर्थ ‘फेकन्युज’ शेअर केल्याची जबाबदारी स्वतःवर घेऊन दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी कंगना वाचकांवर जबाबदारी ढकलून मोकळी झाल्याचे दिसते आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की अभिनेत्री कंगना राणावतने रीट्विट केलेली बातमी उपहासात्मक आणि खोटी आहे. फेसबुकने असे कुठलेही फिचर सुरु केलेले नाही.

वेबसाईटची वस्तुस्थिती कळाल्यानंतरही कंगनाने ना ते ट्विट डिलीट केलेय, ना ही त्याविषयी माफी मागितलीय. उलट एका अर्थाने वाचकांच्या जबाबदारीवर सर्व काही ढकलून देत ती नामानिराळी राहिलीय.

हेही वाचा: ‘कंगनाचे ऑफिस तातडीने तोडणाऱ्या BMCला अतिक्रमणातल्या मशिदी दिसत नाहीत का?’ विचारताना फिरवला जातोय मध्यप्रदेशातल्या मशिदीचा फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा