काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या दोघांचा एकमेकांसोबतचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये दोघांच्याही हातात एक पुस्तिका बघायला मिळतेय. या फोटोच्या आधारे दावा केला जातोय की राहुल आणि प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पाठिंबा दिलाय.
भाजप नेत्यांकडून शेअर केल्या जात असलेल्या फोटोत राहुल आणि प्रियांका गांधींच्या हातातील पुस्तिकेवर उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आणि ‘आएंगे तो योगी ही’ हा नारा, तर आप समर्थकांकडून शेअर केल्या जात असलेल्या फोटोतील पुस्तिकेवर आपने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केलेले भगवंत मान यांचा फोटो आणि ‘भगवंत मान, पंजाब दी शान’ असा नारा बघायला मिळतोय.
भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय माध्यम प्रभारी नीतू सिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘आएंगे तो योगी जी ही…’ अशा कॅप्शनसह हा फोटो ट्विट केलाय.
आम आदमी पक्षाचे समर्थक यूट्यूबर गगनदीप सिंग यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर केलाय.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता ‘झी २४ तास’च्या वेबसाईटवर 21 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा फोटो बघायला मिळाला. फोटोमध्ये राहुल आणि प्रियांका यांच्या हातातील पुस्तिकेवर ‘भर्ती विधान-युवा घोषणापत्र’ असे लिहिलेले बघायला मिळतेय. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याप्रसंगीचा हा फोटो आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिल्लीत उत्तर प्रदेशसाठी युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने 20 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. 8 लाख नोकऱ्या फक्त महिलांना दिल्या जातील, असे प्रियंका गांधी म्हणाल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 21 जानेवारी रोजीच कांग्रेस_का_भर्ती_विधान या हॅशटॅगसह हा फोटो ट्विट केला होता. ‘मनापासून, जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या गोष्टींचे परिणाम चांगलेच होतात. उत्तर प्रदेशच्या जनतेला आणि काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्या शुभेच्छा’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले होते.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या मूळ फोटोवर काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या शीर्षकाव्यतिरिक्त कुठल्याही नेत्याचा फोटो नाही. भाजप आणि आप समर्थकांकडून हा फोटो एडिट करण्यात आला आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एडिटेड आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीचा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असतानाचा फोटो भाजप आणि आपकडून एडिट करण्यात आला असून त्यावर आपल्या पक्षाचे नेते आणि नारे चिपकवण्यात आले आहेत.
हेही वाचा- मुंबईची ओळख म्हणून पोस्ट करण्यात आलेली बस ‘बेस्ट’ नाही, ती तर विदेशी!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment