पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर झुकून त्यांना नमन (modi bowing to nehru) करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की ६ वर्षे नेहरूंना दोष देऊन आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेहरूंसमोर झुकण्याची वेळ आली आहे.
ट्विटरवर इतरही अनेक युजर्सकडून हाच फोटो, याच दाव्यासह शेअर केला जातोय.
ट्विटरवरील कॉपी पेस्ट दाव्यासह फेसबुकवर देखील हा फोटो शेअर केला जातोय.
पडताळणी:
फोटो बघताक्षणीच त्याच्या खरेपणाविषयी शंका यावी अशा पद्धतीचा हा फोटो असल्याने आम्ही फोटोची पडताळणी सुरु केली. व्हायरल फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला त्यावेळी आम्हाला व्हायरल फोटोशी मिळते जुळते फोटोज मिळाले. या फोटोजचा मागोवा आम्ही घेतला.
आमच्या तपासणीत आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत अकाउंटवरून ८ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आलेलं एक ट्विट देखील मिळालं. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वछता केंद्राच्या उदघाटनाचे फोटो अपलोड केलेले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करताना दिसताहेत.
व्हायरल होत असलेल्या फोटोमधील फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्याचा फोटो कट करून आम्ही परत गुगल रिव्हर्स सर्वच्या मदतीने शोधला, त्यावेळी आम्हाला हा फोटो ‘गेट्टी इमेजेस’च्या वेबसाईटवर बघायला मिळाला. तिथे दिलेल्या माहितीनुसार नेहरूंच्या पुतळ्याचा हा फोटो सोलापूरमधील बार्शी येथील आहे.
आम्ही व्हायरल होत असलेला फोटो आणि रिव्हर्स सर्चच्या मदतीने मिळालेल्या फोटोची तुलना केली असता दोन्ही फोटो मध्ये पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांचे पुतळे वगळता बाकी सगळ्याच गोष्टींमध्ये समानता आढळून आली. या व्हायरल फोटोची निर्मिती कशी झाली हे खालील ईमेज पाहून आपल्या लक्षात येईल.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो (modi bowing to nehru) एडिटेड आहे. मूळ फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करून त्यांना नमन करताहेत.
मूळ फोटोशी छेडछाड करत, महात्मा गांधीजींच्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा बसवून चुकीच्या दाव्यांसह हा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला जातोय.
हे ही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झेंड्याकडे पाठ करून सलामी दिलीय? काय आहे सत्य?
[…] पंतप्रधान मोदींचा पंडित जवाहरलाल नेह… […]