अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिली असे सांगत महाराष्ट्र पोलिसांना हिंदू विरोधी म्हणणाऱ्या ‘सनातन प्रभात’ या दैनिकाची बातमी सोशल मीडियातून दणदणीत व्हायरल होतेय. अर्णब विरोधक ही बातमी मजेने शेअर करताना दिसत आहेत.
‘अर्णब गोस्वामी ना उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली : हिंदूविरोधी महाराष्ट्र पोलिसांचा कारनामा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला जातोय. सोबतीने एकंदर घडामोडीवर उपहासात्मक पद्धतीने कॅप्शन सुद्धा लिहिल्या जात आहेत.
फेसबुक सर्चमध्ये ‘सनातन प्रभात अर्णब’ या कीवर्ड्सच्या सहाय्याने सर्च केल्या नंतर तर शेकडो पोस्ट्स आपल्यासमोर येतात.
व्हॉट्सऍपवर देखील हे स्क्रिनशॉट व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी यांनी सांगितले आणि बातमीवरील तारीख जुनी असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणी:
चेकपोस्ट मराठीचे वाचक निलेश यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही व्हायरल स्क्रीनशॉट कसल्याही प्रकारे नजरचूक होऊ नये म्हणून विविध पद्धतीने झूम करून पाहिला आणि खरोखरच त्यावरील तारीख २७ डिसेंबर १०१२ ते २ जानेवारी २०१३ अशी आहे. तसेच त्यावर मराठी महिन्यानुसार ‘मार्गशीर्ष’ चा उल्लेख आहे. परंतु आता ‘अश्विन’ महिना चालू आहे.
अशाप्रकारची काही बातमी सनातन प्रभातने प्रसिद्ध केली होती का या विषयी खात्री करून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्च केले. अशा हेडलाईन किंवा मजकुराशी साधर्म्य साधणारी एकही बातमी वेबसाईटवर उपलब्ध नाही.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांना महाविकास आघाडीचे सरकार ज्या पद्धतीने वागणूक देत आहे त्यावर उच्च न्यायालयाला ‘स्यू मोटो’ अंतर्गत स्वतःहून दखल घ्यावी अशी विनंती करणारे ट्विट केले होते. त्याचाच आधार घेत ‘सनातन प्रभात’ने ९ नोव्हेंबर रोजी ‘अर्णव गोस्वामी यांना कारागृहात दिल्या जाणार्या वागणुकीची मुंबई उच्च न्यायालयाने नोंद घ्यावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही बातमी व्हायरल स्क्रिनशॉटप्रमाणे सापडली नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये अर्णब गोस्वामी यांना उलटे टांगून मिरचीची धुरी दिल्याच्या व्हायरल बातमीचा स्क्रिनशॉट एडीट केलेला आहे, खोटा आहे. अशा प्रकारची बातमी सनातन प्रभातने प्रसिद्ध केली नाही. किंबहुना त्यावरील तारीख तब्बल ७ ते ८ वर्षे जुनी आहे.
हेही वाचा: अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पवारांची भेट घेतल्यानंतर दोनच दिवसात अर्नबला अटक?
Be First to Comment