सोशल मीडियावर डॉ. कफील खान यांचा ट्रॅक्टर चालवत असतानाचा एक फोटो शेअर केला जातोय. दावा केला जातोय उत्तरप्रदेश पोलिसांनी राष्ट्रास धोका असण्याच्या संशयावरून २०० दिवस जेलबंद केलेले डॉ. कफील खान शेतकऱ्यांचा वेष धारण करून ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले (dr. kafeel khan tractor rally). यावरून आंदोलनाची पुढची रणनीती काय असेल याचा अंदाज लावता येईल.
पडताळणी:
आम्ही डॉ. कफील खान यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला भेट देत त्यांची प्रोफाइल स्कॅन केली. आम्हाला त्यांच्या अकाऊंटवरून २६ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ मिळाला. या व्हिडिओमध्ये ते ट्रॅक्टरवर बसलेले आहेत आणि ट्रॅक्टर कसे चालवायचे यासंबंधीच्या बेसिक टिप्स देताहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो याच व्हिडिओच्या स्क्रिनशॉटवरून घेण्यात आला आहे. व्हिडीओच्या बॅकग्राउंडवरून अगदी सहजपणे लक्षात येऊ शकतं की व्हिडीओ कुठल्याशा खेडेगावात शूट करण्यात आलेला आहे. शिवाय व्हिडिओमध्ये कफील खान सांगतात देखील की हे ट्रॅक्टर ज्यावर आपण बसलेलो आहोत, ते गावच्या सरपंचाचे आहे.
कफील यांच्या आजूबाजूला दुसरं कुठलंही ट्रॅक्टर नाही. सहाजिकच हा व्हिडिओ ट्रॅक्टर रॅलीमधला नाही. या गोष्टीची खात्री करण्याकरिता आम्ही शोधाशोध केली असता ‘इंडिया टुडे’चा एक रिपोर्ट मिळाला.
डॉ. कफील खान यांनी ‘ इंडिया टुडे’शी बोलताना सांगितलं की आपण सध्या राजस्थानमध्ये असून व्हिडीओ २५ जानेवारी रोजीच जयपूर जिल्ह्यातील लंगरीयवास गावात शूट करण्यात आलेला आहे. आपण गेल्या महिन्याभरात दिल्लीला गेलेलो नाही.
ट्रॅक्टर रॅलीपूर्वीच शूट करण्यात आलेला व्हिडीओ २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांनी तो ट्विटरवरून पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील त्यांनी सुरुवातीलाच चला ट्रॅक्टर शिकुयात असं म्हण्टलंय. तसेच कफील खान यांनी शेतकऱ्यांनी आतापर्यत दाखवलेल्या धीराचं आणि शिस्तीचं कौतुक करत आंदोलनाचा अहिंसक आणि शांतीचा मार्ग न सोडण्याचं आवाहन केलेलं आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर डॉ. कफील खान यांचा ट्रॅक्टर चालवत असतानाचा फोटो (dr. kafeel khan tractor rally) चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
डॉ. कफील खान दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी झाले नव्हते. सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला फोटो राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील लंगरीयवास या खेडेगावातील आहे.
हे ही वाचा- भाजप कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी हिंसक मार्ग वापरण्याचा आदेश देण्यात आलाय?
Be First to Comment