तालिबान्यांच्या अफगाणिस्थानवरील कब्ज्यानंतर पंजशीर खोरं (Panjshir Valley) या ना त्या कारणाने चर्चेत आहे. कारण तालिबान्यांना विरोध झाला तो पंजशीर खोऱ्यामध्येच. दरम्यान, तालिबान्यांकडून पंजशीर प्रांत ताब्यात घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असली, तरी पंजशिरमधील लढाऊ गटाकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले आहेत.
भारतीय सोशल मीडियात मात्र सध्या कृष्ण आणि पांडवांचं एक पेंटिंग (Krishna and pandava painting) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. दावा केला जातोय की हे पेंटिंग सध्या अफगाणिस्थानातील पंजशीर पॅलेसमध्ये (panjshir palace paintings) आहे. हा पंजशीर पॅलेस पाच पांडवांच्या सन्मानार्थ बनविण्यात आल्याचं देखील सांगण्यात येतंय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही पंजशीर पॅलेसचा (Panjshir palace) शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण अफगाणिस्थानमध्ये कुठेही ‘पंजशीर पॅलेस’ नावाचे कुठलेही स्थळ असल्याचे आढळून आले नाही. पंजशीर खोऱ्यात ‘पंजशीर’ याच नावाची नदी आहे, पण ‘पॅलेस’ मात्र कुठेही नाही. सहाजिकच आहे की ‘पंजशीर पॅलेस’चं जर अस्तित्वात नसेल, तर तिथे कृष्ण आणि पांडवांचं पेंटिंग (panjshir palace paintings) असण्याचा मुद्दाच निकाली निघतो.
पेंटिंग नेमकं कुठलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं पेंटिंग नेमकं कुठलं हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला रशियाच्या सेंट पिटर्सबर्ग येथील SPB आर्ट गॅलरीच्या वेबसाईटवर हेच पेंटिंग बघायला मिळालं. वेबसाईटवरील माहितीनुसार ‘कृष्ण आणि पांडव’ नावाचं हे पेंटिंग रसिकानंद नावाच्या कलाकाराने बनवलं होतं.
उपलब्ध माहितीनुसार हे पेंटिंग बनवणाऱ्या रसिकानंद यांचा जन्म १९७३ मध्ये रशियामधील कोमसोमोल्स्क-ऑन-अमूर शहरात झाला होता. रसिकानंद हे ‘क्रिएटिव्ह युनिअन ऑफ आर्टिस्ट्स ऑफ रशिया’ आणि ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्टिस्ट्स’चे सदस्य आहेत.
आम्हाला रसिकानंद दास (Rasikananda Das) यांच्या फेसबुक प्रोफाईलवर देखील हे पेंटिंग बघायला मिळालं. पेंटिंगचा फोटो पोस्ट करून फोटोच्या कॅप्शनमध्ये ते लिहितात,
“माझं हे जुनं पेंटिंग भारतीय सोशल मीडियात खूप लोकप्रिय होताना बघणं रंजक आहे. काही लोक दावा करताहेत की हे पांडवांचं वास्तव्य राहिलेलं पंजशिरमधील ऐतिहासिक ठिकाण आहे आणि मी हे ऐतिहासिक स्थळ चित्रित केलं आहे. नाही, ती माझी मूळ निर्मिती आहे, ऐतिहासिक स्थळांचं चित्रण नाही. (हे त्या सर्वांसाठी जे चुकीच्या दाव्यांना बळी पडले आहेत)
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील कृष्ण आणि पांडवांचं व्हायरल पेंटिंग अफगाणिस्थानमधील पंजशीर पॅलेसमधील नाही तर रशियाच्या सेंट पिटर्सबर्गमधील एका आर्ट गॅलरीतील आहे. शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट अशी की संपूर्ण अफगाणिस्थानमध्ये ‘पंजशीर पॅलेस’ नावाचं कुठलंही ठिकाण अस्तित्वातच नाही.
हेही वाचा- हिंदू धर्मियांची माथी भडकाविण्यासाठी पत्रकार दीपक चौरसियांनी वापरला पाच वर्षांपूर्वीच्या पेंटिंगचा संदर्भ!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment