केरळमधील गुरुवयूर मंदिराच्या (guruvayur temple) यज्ञकुंडातील आगीत श्रीकृष्णाची हातात बासरी घेतलेली त्रिभंगी मुद्रेतील प्रतिमा दिसत असल्याचे दावे सोशल मीडियातून गेल्या काही वर्षांपासून व्हायरल होत आहेत.
‘केरल में गुरुवयूर मन्दिर जो श्री krishan जी का हे वहा हवन करते समय अगनि में श्री krishan ji दर्शन देते हे इस गोल्डन चित्र को अपने सभी दोस्तों को भेजे, क्योंकि आज जो कोई यह भेजता है धन धान्य हो जाता है।’ या कॅप्शनसह यज्ञकुंडातून निघणाऱ्या ज्वाळांत कृष्णाची प्रतिमा दिसत असल्याचे फोटोज पोस्ट केले जात आहेत.
फेसबुकवर सदर दावे २०१७ सालापासून व्हायरल होत आहेत. परंतु आता त्याच पोस्ट्सचे स्क्रिनशॉट व्हॉट्सऍपवर व्हायरल केले जाताहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण साखरे यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी त्यातील फोटोज रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले. या शोधकार्यात ‘न्यूज १८ इंडिया’चा २३ एप्रिल २०१७ रोजीचा एक रिपोर्ट समोर आला.
‘खबर पक्की है?’ नावाच्या कार्यक्रमात त्यांनी त्यावेळी व्हायरल होत असलेल्या दाव्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी गुरुवयूर मंदिर (guruvayur temple) संस्थानाचे प्रबंधक सी.सी. शशीधरन यांची भेट घेतली आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
काय म्हणाले श्री शशीधरन?
‘मागच्या काही दिवसांपासून गुरुवयुर मंदिराच्या बाबतीत काही पोस्ट्स, फोटोज व्हायरल होत आहेत. हवनकुंडाची प्रतिमा सर्वत्र शेअर होत आहे. याविषयी मी स्पष्ट करू इच्छितो की आमचा या फोटोजशी काहीएक संबंध नाही. जर आम्हाला हे कोण करत आहे याविषयी निदर्शनास आणून दिले तर आम्ही कायदेशीर कारवाईचा मार्ग नक्कीच अवलंबू.’
पुजाऱ्यांचा पेहराव:
शशीधरन यांनी असेही सांगितले होते की आमच्या मंदिरातील पुजारी पिवळ्या रंगाचे धोतर नेसत नाहीत त्यांची पांढरी लुंगी असते. याची खातरजमा करण्यासाठी आम्ही ऑफिशियल वेबसाईटपासून इतरही काही ठिकाणच्या ‘गुरुवयूर’ मंदिराच्या फोटोजची तपासणी केली आणि हे स्पष्ट झाले की खरोखर येथील पुजारी केवळ पांढऱ्या रंगाची लुंगी गुंडाळतात.
८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवयुर मंदिरास भेट दिली होती त्यात त्यांच्यासोबत दिसणाऱ्या पुजाऱ्यानेसुद्धा पांढरीच लुंगी परिधान केली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे तथ्यहीन असल्याचे निष्पन्न झाले. यज्ञकुंडाच्या आगीत श्रीकृष्णाची प्रतिमा दिसत असलेल्या फोटोजचा केरळमधील गुरुवयुर मंदिराशी काहीएक संबंध नाही.
प्राथमिक अंदाजानुसार ज्वालांमध्ये दिसणारी ती प्रतिमासुद्धा फोटोशॉपच्या मदतीने तयार केलेली असावी. अर्थात याविषयी ठोस पुरावे नसले तरीही व्हायरल दावा विश्वासपात्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा: ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहण्यामागे चमत्कार नसून विज्ञान आहे
[…] हेही वाचा: खरंच केरळच्या गुरुवयूर मंदिराच्या यज… […]
[…] हेही वाचा: खरंच केरळच्या गुरुवयूर मंदिराच्या यज… […]