Press "Enter" to skip to content

पंतप्रधान मोदींचे कुटुंबीय वडलांच्या मृत्यूसाठी मोदींनाच जबाबदार मानतात?

सोशल मीडियावर एका न्यूजपेपरचे कटिंग व्हायरल होतेय. या न्यूजपेपरच्या हेडींगमध्ये दावा करण्यात आलाय की ‘आज देखील नरेंद्र मोदींचे बहीण-भाऊ वडलांच्या मृत्यूसाठी मोदींनाच जबाबदार मानतात’.

Advertisement

कटिंगमध्ये दावा करण्यात आलाय की मोदींनी (Narendra Modi) आपल्याच घरातून सोन्याची चोरी करून घरातून पळ काढला होता. ही गोष्ट ज्यावेळी त्यांच्या वडलांना समजली त्यावेळी त्यांना ह्र्दयविकाराचा झटका आला. त्यानंतर पैशाच्या कमतरतेमुळे त्यांना चांगले उपचार मिळू शकले नाही आणि आठ महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मोदींच्या भावंडांनी त्यांच्या विरोधात एफआयआर देखील दाखल केली आहे.

बिहारमधील महुआचे आमदार डॉ. मुकेश रोशन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो ट्विट केलाय. जवळपास ३८२ ट्विटर युजर्सकडून हा फोटो रिट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल बातमीच्या पडताळणीसाठी आम्ही किवर्डच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला व्हायरल कटिंगमधील माहितीची पुष्टी करणारी कुठल्याही विश्वासार्ह माध्यमाची बातमी बघायला मिळाली नाही.

व्हायरल कटिंगमधील बातमी ‘दिल्ली न्यूज नेटवर्क’च्या हवाल्याने छापण्यात आली आहे, जिचा कुठलाही आधार नाही. शिवाय बातमीची ना तारीख उपलब्ध आहे, ना बातमी देणाऱ्या पत्रकाराची कुठली माहिती. कटिंगमध्ये कुठलाही घटनाक्रम देखील बघायला मिळत नाही. गुगलवर ‘दिल्ली न्यूज नेटवर्क’चा शोध घेतला असता या नावाने फक्त एक फेसबुक पेज बघायला मिळते. ‘दिल्ली न्यूज नेटवर्क’ अशा प्रकारचे कुठलेही वृत्तपत्र मिळत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदींनी (Prahlad Modi) देखील व्हायरल कटिंग आणि त्यामधील कथा चुकीची फेक असल्याचे सांगितले आहे. प्रल्हाद मोदी सांगतात,

“अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही. मी किंवा माझ्या बहीण-भावांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात कुठलीहीएफआयआर दाखल केलेली नाही.”

प्रल्हाद मोदी सांगतात की अशा प्रकारचे दावे काही पहिल्यांदा व्हायरल होत नाहीयेत. यापूर्वी देखील २०१६ मध्ये त्यांच्याच नावाने एक कटिंग व्हायरल झाले होते. नरेंद्र मोदींनी संन्यास घेतला नव्हता, तर घरातील सोने चोरल्यामुळे त्यांना घरातून हाकलून देण्यात आले होते, असे प्रल्हाद मोदींनी म्हंटल्याचे या कटिंगमध्ये सांगण्यात आले होते. अर्थात हे चुकीचे होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान मोदींचे कुटुंबीय आज देखील वडलांच्या मृत्यूसाठी मोदींनाच जबाबदार मानत असल्याचा दावा करणारे सोशल मीडियावरील कटिंग फेक आहे. या कटिंगमधील दाव्यांचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. शिवाय मोदींचे भाऊ प्रल्हाद पटेल यांनी देखील व्हायरल दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- पंतप्रधान मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती गौतम अदानींच्या पत्नी आहेत?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा