Press "Enter" to skip to content

गोकुळाष्टमीला खुद्द श्रीकृष्ण मथुरेच्या मंदिरातील भाविकांनी ठेवलेली दहीहंडी फोडतो? वाचा सत्य!

गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणजे हिंदू देवता श्रीकृष्णाचा (Lord krishna) जन्मदिन. या दिवशी मथुरेतील दादाजी मंदिरात भाविक दहीहंडी (dahi handi) ठेवतात आणि खुद्द श्रीकृष्ण हंडी फोडतो अशा प्रकारच्या दाव्यांसह एक हंडी अपोआप फुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

‘मथुरेत श्रीकृष्ण मंदिराजवळ दादाजी मंदिर आहे गोकुळाष्टमी दिवशी तिथे भाविक दहीहंडी ठेवतात आणि खुद्द श्रीकृष्ण हंडी फोडतो आज देव कुठे आहे विचारणाऱ्या लोकांना हे चमत्कार रुपी उत्तर देवाचं…’

या अशा मजकुरासह साधारण दीड मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला जातोय.

ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सऍपवरही हे दावे व्हायरल होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण साखरे, बळीराम पाटील आणि दिनदयाळ यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

आम्ही सर्वात आधी हा व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्याचा प्रयत्न केला. विविध कीवर्ड्स टाकूनही गुगल सर्चद्वारे मथुरेत (Mathura) ‘दादाजी’ नावाचे कुठले मंदिर असल्याची माहिती मिळाली नाही.

व्हिडिओ बारकाइने ऐकला असता त्यातील व्यक्ती १.२४ व्या मिनिटाला ‘जय हो दाऊ दादा, पेहली बार हमने दर्शन करे हो ब्रीजमें’ असे वाक्य बोलताना आढळले. यातून दोन गोष्टी लक्षात येतात एक म्हणजे सदर ‘चमत्कार’ दरवर्षी होत नाही. पहिल्यांदाच झालाय आणि ती घटना ‘ब्रीज’ मध्ये घडलीय.

ब्रीज किंवा ब्रज म्हणजे यमुना नदीच्या दोन्ही बाजूचा परिसर जेथे कृष्णाचे वास्तव होते असे मानले जाते. यामध्ये उत्तर-प्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या सर्व राज्यांतील काही भूभाग येतो त्यामुळे सदर घटना मथुरेतच घडली असेल हे ठामपणे सांगता येत नाही.

व्हिडीओत उच्चारल्याप्रमाणे ‘दाऊ दादा’ या शब्दाचा आधार घेत पुन्हा आम्ही गुगल सर्च केले असता आम्हाला युट्युबवर एक व्हिडीओ सापडला. ज्यामध्ये मंदिराच्या आत दिसणाऱ्या सर्व बाबी तंतोतंत जुळणाऱ्या आढळल्या.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘गिरीराज जी लुक लुक दाऊजी’ असे लिहिले असून ‘गिरीराज मुखरविंद मंदिर, गोवर्धन’चे लोकशेन दिसत आहे.

याच अनुषंगाने अधिक शोधाशोध केली असता ब्रज रसिक नावाच्या वेबसाईटवर ‘गिरीराज गोवर्धन, ब्रज येथील लुक लुक दाऊजी महाराज मंदिराच्या (Luk Luk Dauji Maharaj temple)आतले दृश्य’ दाखवणारा फोटो सापडला. यात असणाऱ्या दगडी मूर्तीचा आकार आणि व्हायरल व्हिडीओतील मूर्तीचा आकार तंतोतंत जुळणारा आहे.

luk luk dauji maharaj temple govardhan inside view
Source: BrajRasik

याच वेबसाईटवर या मंदिराचा बाहेरच्या बाजूचाही फोटो आहे.

Image
Source: BrajRasik

या मंदिरात आणि मथुरेच्या श्रीकृष्ण मंदिरात साधारण ३२ किलोमीटर एवढे अंतर असल्याचे गुगल मॅपवर दिसून येते. तसेच हे मंदिर अतिशय छोटे आणि काहीसे दुर्लक्षित असल्याचेही जाणवते. कारण मथुरेत असणारे दाऊ दादा म्हणजेच बलरामाचे मंदिर बरेच मोठे बनवले आहे.

राहिला प्रश्न हंडी फुटण्याचा चमत्काराचा, तर आम्ही गेली २० वर्षे कुंभारकाम करणाऱ्या ‘मयूर कुंभार’ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की जर ते मडके व्यवस्थित भाजले नसेल आणि त्याची जाडी एकसंध न ठेवता एका बाजूने पातळ राहिली असेल तर अगदी पाण्यानेही ते गळून जाऊ शकते. त्यामुळे यात चमत्कारासारखा काही प्रकार असल्याचे जाणवत नाही.

मयूर कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि व्हिडीओतील व्यक्तीने सदर बाब पहिल्यांदाच होतेय हे लक्षात घेतले असता हे स्पष्ट होतेय की हा निव्वळ योगायोग आहे. केवळ एकच मडके कसे फुटले? दुसरे का नाही? या प्रश्नालाही तार्किक उत्तर मिळत नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ मथुरेतील ‘दादाजी’ मंदिरातील नसून गोवर्धन येथील गिरीराज मंदिराच्या जवळ असणाऱ्या ‘लुक लुक दाऊजी’ या छोट्याशा मंदिराचा आहे. तसेच यात घडलेली बाब दर वर्षी घडणारा दैवी चमत्कार नसून योगायोगाने एकदाच घडलेला प्रकार आहे.

हेही वाचा: खरंच केरळच्या गुरुवयूर मंदिराच्या यज्ञकुंडात श्रीकृष्णाची प्रतिमा दिसते का?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा