Press "Enter" to skip to content

सॅनिटायझरच्या वारंवार वापराने कॅन्सरचा धोका आहे का ?

सॅनिटायझरच्या सततच्या वापराने कॅन्सरसारखा आजार जडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. असा दावा सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियातला हा दावा प्रामुख्याने दोन मेसेजेसच्या माध्यमातून व्हायरल केला जातोय. पहिला मेसेज म्हणजे ‘युवा गौरव’ या हिंदी न्यूज पेपरच्या एका बातमीचं कात्रण.

Advertisement

‘सेनेटाइजर खतरनाक, साबून का करें उपयोग, शोध में खुलासा:- सेनेटाइजर के 50 से 60 दिन लगातार उपयोग से कैंसर-त्वचा रोग का खतरा’

Yuva gaurav news claiming sanitizer as carsinogenic
Credit: Yuvagaurav

सॅनिटायझरच्या वारंवार वापराने कॅन्सर आणि त्वचा रोगाच्या धोक्याची सूचना देणाऱ्या या बातमीत इतरही अनेक दावे करण्यात आलेले आहेत. सॅनिटायझरमध्ये वापरण्यात येणारे केमिकल शरीराला कशाप्राकारे हानी पोहचवू शकतात, याबद्दल पण या बातमीत माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बातमीसोबत देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा फोटो जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे हा आरोग्यमंत्र्यांचा सल्ला असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय.

आता येउयात दुसऱ्या एका मेसेजवर. दुसरा मेसेज म्हणजे एक व्हॉटसऍप फॉरवर्ड आहे. “वारंवार सॅनिटायझरचा वापर केल्याने त्वचाविकार उद्धभवू शकतो. खाज येणे, आग होणे, हात लाल पडणे असे आजार होऊ शकतात. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे गजकर्ण, त्वचा कॅन्सर तसेच पेशींवरही परिणाम होतो. त्यामुळे सॅनिटायझरऐवजी शक्यतो साबणाचा वापर करावा.

viral whatsapp msg about sanitizer
Credit: Whatsapp

ज्यावेळी साबण आणि पाणी उपलब्ध होऊ शकत नसेल त्यावेळी त्याचा वापर करावा. तसेच, 60 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कहोलचे प्रमाण असलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा, अशी माहिती डॉ. सुचिता लवंगरे देतात.” असं या व्हॉटसऍप फॉरवर्डमध्ये सांगण्यात आलंय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने ज्यावेळी या व्हॉयरल दाव्यांची पडताळणी करायला घेतली त्यावेळी आम्ही गुगलवर ‘Sanitizer and Cancer’ असे कीवर्ड वापरून सर्च केलं.

त्यावेळी आम्हाला इनसायडरचा ‘Does hand sanitizer work? Yes, but it’s important to understand its limitations’ हा लेख देखील वाचायला मिळाला.

लेखामध्ये सॅनिटायझरच्या फायद्यांविषयी तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठीच्या मर्यादांविषयी सविस्तरपणे लिहिलंय. ‘रँचेल मँकफर्सन’ यांचा हा लेख ‘पिट्सबर्ग मेडिकल सेंटर’ विद्यापीठात एम.डी.एम.एस. असणाऱ्या ‘ग्रॅहम स्नायडर’ यांनी तपासलेला आहे. लेखातील माहिती वैद्यकीयदृष्ट्या योग्य असल्याची खातरजमा स्नायडर यांनी केली आहे.

काय सांगतो हा लेख ?

१.      सॅनिटायझर हे अनेक जीवाणू आणि विषाणू मारण्यासाठी उपयुक्त असले तरी ते सगळ्याच जंतूवरती प्रभावी नाहीत.

२.      वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सॅनिटायझरच्या वापरापेक्षा साबणाने हात धुण्यास अधिक प्राधान्य देतात. पण ज्यावेळी साबण आणि पाणी उपलब्ध नसेल त्यावेळी सॅनिटायझरचा वापर करायला काहीच हरकत नाही.

३.      सॅनिटायझरने संसर्गजन्य आजाराच्या संक्रमनापासून तुमचे संरक्षण करावे, यासाठी त्यात ६० ते ९५ टक्के अल्कोहोल असणे आवश्यक आहे.

४.      सॅनिटायझरपासून मानवास काहीही धोका असल्याचे कुठलेही वैद्यकीय पुरावे अजून तरी उपलब्ध नाहीत. जास्त प्रमाणात वापरला गेल्यास त्वचेला थोडीफार खाज सुटू शकते, मात्र सॅनिटायझरपासून मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक धोका असल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.

त्यानंतर आम्हाला सरकारी बातम्या देणारी संस्था, ‘प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो’चं एक ट्वीट देखील मिळालं ज्यात सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला दावा फेक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच कोरोनापासून बचावाकरिता ७० टक्के अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरची शिफारस करण्यात आली असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

PIB fact check tweet for sanitizer
Credit: Twitter

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे की सोशल मिडीयावर सॅनिटायझरच्या वारंवार वापराने कॅन्सर होत असल्याचा जो दावा व्हायरल होतोय, तो फेक आहे. सॅनिटायझरपासून मानवाला काही धोका असल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत.

वैद्यकीय तज्ञांच्या मते सॅनिटायझरपेक्षा साबण आणि पाण्याने हात स्वच्छ करणे कधीही चांगले. पण जेव्हा साबण आणि पाणी उपलब्ध नसेल त्यावेळी सॅनिटायझरचा वापर केला जाऊ शकतो.

अल्कोहोलचे प्रमाण ६० ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान असणारे सॅनिटायझर अधिक प्रभावी  असते, हा जो दुसरा दावा डॉ. सुचिता लवंगरे यांच्या नावाने फिरतोय त्यात बऱ्यापैकी तथ्य आहे मात्र  डॉ. सुचिता लवंगरे यांनी देखील कॅन्सरची जी भीती दाखवली आहे, ती अनाठायी आणि निराधार आहे.

हेही वाचा:

गरम पाणी किंवा कडक ऊन कोरोना व्हायरस पासून वाचवू शकत असल्याचे दावे खोटे !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा