दीक्षाभूमी समितीने ऑक्सिजन प्लांट निर्मिती करिता १२० कोटी रुपये दान दिल्याचा (diksha bhumi donate 120 cr) दावा करणारे ग्राफिक्स आणि काही व्हिडीओज सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अनिकेत दुर्गे यांनी व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेले ग्राफिक्स पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली.
अशाच ग्राफिक्सचा वापर करून बॅंकग्राउंडला भीमगीते टाकून बनवलेले व्हिडिओज युट्युबवर अपलोड केले आहेत.
फेसबुकवरही अनेकांनी या दाव्यासह इमेजेस आणि व्हिडीओज पोस्ट केले आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीसाठी दीक्षाभूमीच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. या वेबसाईटवर सोशल मीडियावरील दाव्यांची पुष्टी करणारा कुठलाही पुरावा किंवा बातमी मिळाली नाही.
अजून सखोल तपास केला असता दीक्षाभूमीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूर’चे सचिव डॉ. सुधीर सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीच्या फेसबुक पेजवरून व्हायरल दाव्यांविषयी दिलेले स्पष्टीकरण आमच्या बघण्यात आले.
फुलझेले यांनी दिलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे :
“जय भीम, काही समाजमाध्यमांतून दीक्षाभूमीने ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी काही रक्कम दिल्याची खोडसाळ बातमी प्रसारित होत आहे. ही बातमी जर खरी असती तर दीक्षाभूमीला आणि सर्व समाजाला खूप आनंद झाला असता पण दुर्दैवाने ही बातमी खोटी आहे.
दीक्षाभूमीने कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवायचा म्हणून माननीय जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगर पालिका यांना पत्र लिहून कळवले आहे की दीक्षाभूमीवरील यात्री निवास आम्ही कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ. हेच एक दीक्षाभूमी कडून कोरोनाच्या विरुद्ध उचललेले एक पाउल आहे.”
– डॉ. सुधीर सदानंद फुलझेले ( सचिव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूर)
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये दीक्षाभूमीने ऑक्सिजन प्लांट्सकरिता १२० कोटी रुपये दान दिल्याचा (diksha bhumi donate 120 cr) व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. दीक्षाभूमी समितीने कोरोना रुग्णांसाठी ‘यात्री निवास’ खुला केल्याचे पत्र प्रशासनास दिले आहे. या व्यतिरिक्त कुठलीही आर्थिक मदत दान म्हणून दिलेली नाही.
हे ही वाचा: मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेणं नुकसानकारक ठरू शकतं का?
Be First to Comment