Press "Enter" to skip to content

युक्रेनने नरेंद्र मोदींच्या विमानावर मिसाईल डागून त्यांच्या हत्येचा कट रचला होता? वाचा सत्य!

मलेशियाच्या प्रवासी विमानावर १७ जुलै २०१४ रोजी युक्रेनमधून मिसाईल डागण्यात आली. त्यात २९७ प्रवासी मारले गेले. परंतु हा घातपात खरेतर नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) ठरला होता. सुदैवाने त्यांचे विमान १० मिनिट उशिरा निघाले म्हणून यातून ते वाचले. आता मात्र मोदींच्या हत्येचा कट रचणारा युक्रेन आपल्यापुढे मदतीसाठी हात पसरत आहे, अशा प्रकारचे दावे सध्या जोरदार व्हायरल होतायेत.

Advertisement

व्हायरल मेसेजमधील मजकूर:

'झालं असं होतं कि त्याचं दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी फ्रँकफर्ट मधून एक आंतराष्ट्रीय संमेलन संपल्या वर भारतात परत येत होते.
कुठल्याही देशाचे पंतप्रधान, राष्ट्र प्रमुख जर हवाई प्रवास करत असतात तेव्हा ते ज्या ज्या देशांच्या हवाई परिसरातून प्रवास करतात त्या त्या देशाला संपर्क केला जातो आणि जेवढा वेळ ते विमान त्या देशाच्या हवाई सीमे मध्ये आहे तेवढा वेळ त्या देशाच्या हवाई सीमा No Flying Zone म्हणून घोषित केल्या जातात.
दुसरे कुठलेही विमान त्या वेळे मध्ये उड्डाणं करू शकत नाही.
मोदीजी जर्मनी फ्रँकफर्ट वरून निघून भारतात येताना युक्रेन च्या हवाई सीमे मधून येणार होते आणि म्हणूनच युक्रेन ची हवाई सीमा पंतप्रधानांचे विमान हवाई सीमे पलीकडे जाई पर्यंत चा वेळ No flaying Zone म्हणून घोषित झाल्या होत्या.
नेमकं मोदींच्या विमानात काही तरी तांत्रिक घोळ झाला आणि विमानाचे जर्मनी वरून उड्डाणं 10मिनिटं उशिरा झाले.
आणि नेमक्या ज्या वेळेला मोदींचे विमान युक्रेन च्या हवाई सीमे मधून जाणार होते त्या वेळेला मोदींच्या विमानाला उशीर होत असल्या मुळे मलेशिया च्या विमानाला उड्डाणं करण्याची परवानगी मिळाली.
तेच विमान त्याचं अगोदर ठरलेल्या वेळे मध्ये पडले गेले. दुसरे कुठेलेही विमान त्या वेळेत हवाई सीमे मध्ये असूच शकत नव्हते. मोदी वाचले पण ह्या सर्व घटने मधून युक्रेन ने आपले हात झटकले. किती झटकले माहिती आहे??? युक्रेन ने साधा खटला पण चालवला नाही. Midia मध्ये बातमी नाही. कुठेही गवगवा नाही.'

सदर मेसेज व्हॉट्सऍपवर एवढा जोरदार व्हायरल होत आहे की त्यावर व्हॉट्सऍपने ‘Forwarded Many Times’ असा टॅग लाऊन टाकलाय.

Source: Whatsapp

हे दावे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शशिकांत कोचीकर, अस्मिता भौमिक, सतीश सांगळे, संतोष भोजने, राजू खरे, गोविंद भुजबळ, सी.एस.केतकर, व्ही.जी.जांभेकर, निशिकांत गोळे आणि अशोक किरदत यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

हे दावे फेसबुकवरही अनेकांनी शेअर केले आहेत.

Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्ट व्यवस्थित वाचून एकेका मुद्द्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला.

१. कुठल्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखासाठी ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित केला जातो का?

कुठल्याही देशाचा राष्ट्रप्रमुख प्रवास करत असताना ‘नो फ्लाईंग झोन’ (No Fly Zone)घोषित करण्यात येतो का, हे शोधण्याचा प्रयत्न केला असता अशा प्रकारचा कुठलाही प्रोटोकॉल असल्याचे आढळून आले नाही. बीबीसीचा एक रिपोर्ट आम्हाला मिळाला ज्यामध्ये ‘नो फ्लाईंग झोन’विषयी विस्तृत माहिती दिली आहे.

बीबीसीच्या बातमीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव काही विशिष्ट इमारती, जागांवरून प्रत्येक देशाद्वारे तेवढ्या जागेपुरते ‘नो फ्लाईंग झोन्स’ असतात. परंतु ऐनवेळी ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्याचा कुठलाही प्रघात नाही. आजवर जगभरात अगदी बोटावर मोजण्या इतक्या वेळाच ‘नो फ्लाय झोन’ घोषित केले आहेत.

१९९१ साली आखाती देशांतील युद्धादरम्यान अमेरिकेने इराक मध्ये २ नो फ्लाय झोन घोषित केले होते. १९९२ साली संयुक्त राष्ट्राद्वारे बाल्कन संघर्षादरम्यान बोस्नियाच्या हवाई मार्गांतून सैनिकी विमानांना बंदी घातली होती. २०११ साली लिबियामध्ये झालेल्या सैनिकी कारवाईदरम्यानसुद्धा संयुक्त राष्ट्राने नो फ्लाय झोनच्या सूचना दिल्या होत्या.

युद्धाच्या काळात देखील ‘नो फ्लाईंग झोन’ लागू करण्याची मागणी बरेचदा केली जाते. सध्या युक्रेनकडून ‘नाटो’कडे हीच मागणी केली की नाटो देशांचे हवाई क्षेत्र रशियन विमानांसाठी ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात यावे.

२. मलेशियाच्या विमानावर युक्रेनने हल्ला केला होता का?

मलेशिया एअरलाईन्सचे MH17 विमान ऍमस्टरडॅमवरून क्वालालंपूरला निघाले होते. १७ जुलै २०१४ रोजी रडारवरून गायब झालेल्या या विमानावर मिसाईल डागून खाली पाडण्यात आल्याचे ऑक्टोबर २०१५ साली प्रकाशात आले. २८३ प्रवासी आणि १५ कर्मचारी मिळून २९८ जणांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.

डच तपास यंत्रणेच्या सखोल तपासात हे स्पष्ट झाले की युक्रेनच्या पूर्व सीमेवरून हा हल्ला झाला होता, परंतु हल्ल्यामागे रशियाचे पाठबळ असणाऱ्या फुटीरतावादी संघटनेचा हात होता. व्हायरल पोस्टमध्ये उल्लेख असलेले ४ जण रशियाशी संबंधितच होते. ज्या ईगोर गिर्कीनचा (Igor Girkin) मेसेजमध्ये उल्लेख आहे तो रशियाच्या FSB या गुप्तहेर संघटनेत कार्यरत आहे.

ज्या मिसाईलने विमानावर हल्ला केला गेला ते सुद्धा रशियन बनावटीचे होते.अर्थातच रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि सदर तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केलाय. या एकूण तपासात युक्रेन सरकारचा कसलाही संबंध नसल्याचे समजते.

३. पंतप्रधान मोदींकरिता हा कट रचला होता का?

व्हायरल मेसेजमध्ये असे लिहिले आहे की नरेंद्र मोदी यांचे विमान १० मिनिट उशिरा निघाल्याने ते वाचले आणि त्यांच्या ऐवजी मलेशियाच्या विमानावर हल्ला झाला. याविषयी तपास करत असताना असे समजले की पंतप्रधान मोदी यांचे विमान (Air India-001) जर्मनीच्या फ्रांकफुर्टमधून ११२२ GMT या वेळी निघाले आणि मलेशियाचे विमान १३२० GMT ला रडार वरून गायब झाले. म्हणजेच दोन्ही वेळेत जवळपास ३ तासांचे अंतर होते.

तत्कालीन नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी पत्रकारांना सदर घटनेविषयी प्रतिक्रिया दिली होती.

“आपल्या पंतप्रधानांच्या विमानाला कसलाही धोका नव्हता. Air India One विमानाविषयीची माहिती अंतराष्ट्रीय रडारवर होतीच. कुठल्याही देशाच्या वायू सीमेतून एखादे विमान जाते तेव्हा त्यांना याविषयी माहिती असते की हे नेमके कोणत्या देशाचे विमान आहे, त्यात कोण आहे. त्यामुळे चुकुनही हल्ल्याचा धोका संभवतच नाही.”

– अशोक गजपती राजू, माजी नागरी उड्डयन मंत्री, भारत

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल होत असलेले दावे निराधार आणि चुकीचे आहेत. सदर मेसेज लिहिणाऱ्या व्यक्तीची विविध बाबींविषयीची माहिती चुकीची आहे. राष्ट्र प्रमुखासाठी नो फ्लाईंग झोन, मलेशिया विमानावरील हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संख्या, हल्ल्याच्या तपासात समोर आलेली माहिती, मलेशियाच्या विमानात आणि नरेंद्र मोदींच्या विमानातील वेळेचा फरक अशा विविध गोष्टींविषयी दावा करणाऱ्या व्यक्तीने चुकीची माहिती लिहिली आहे.

हेही वाचा: रशियाने घर आणि गाडीवर भारतीय तिरंगा लावणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची ग्वाही दिलीय? वाचा सत्त्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा