Press "Enter" to skip to content

कंगनाचे ऑफिस पाडण्याचे आदेश देण्यापूर्वी उद्धव ठाकरे हिटलर समोर नतमस्तक झाले?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोमध्ये उद्धव ठाकरे हिटलरच्या प्रतिमेसमोर हात जोडताना (uddhav thackeray bow before hitler) दिसताहेत.

दावा केला जातोय की उद्धव ठाकरे यांनी क्रूरकर्मा हुकुमशहा अशी ओळख असणाऱ्या हिटलरच्या प्रतिमेला झुकून नमन केल्यानंतरच अभिनेत्री कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोजर चालवायचे आदेश दिले.

Advertisement

आर्काइव्ह पोस्ट

शिवसेना विरुद्ध कंगना राणावत असा वाद बराच चिघळल्यानंतर बीएमसीकडून कायदेशीर कारवाई अंतर्गत कंगनाच्या ऑफिसवर बुलडोजर चालविण्यात आला. त्यानंतर कंगना समर्थकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकार फॅसिस्ट असल्याचे दावे करण्यात येत आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्याकडेच लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

पडताळणी:

फोटोच्या सत्यतेच्या पडताळणीसाठी आम्ही ‘गुगल रिव्हर्स सर्च’च्या मदतीने हा फोटो शोधला असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढे उद्धव झाले नतमस्तक’ या हेडलाइनखाली प्रकाशित बातमी मिळाली.

बातमीनुसार उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील यावर मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी परतताच उद्धव ठाकरे थेट बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झाले.

‘आपलं महानगर’ने देखील ‘महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन’ याच कॅप्शनसह आपल्या बातमीमध्ये हा फोटो वापरलेला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या ऑफिसमार्फत चालविण्यात येणाऱ्या व्हेरिफाइड ट्विटर हँडलवरून देखील २६ नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये आम्हाला हाच फोटो मिळाला. या ट्विटमध्ये देखील मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले, असेच म्हंटले आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक झालेल्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी हिटलरची प्रतिमा बसवून उद्धव ठाकरेंची फॅसिस्ट प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिटलरसमोर (uddhav thackeray bow before hitler) नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झुकले आहेत.

हे ही वाचा- राज ठाकरेंनी कंगनाची बाजू घेत संजय राऊतांना धमकावले नाही, ते ट्विटर हँडल फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा