सोशल मीडियावर कथितरित्या टाईम मासिकाच्या कव्हर पेजचा म्हणून एक फोटो शेअर केला जातोय. दावा करण्यात येतोय की टाईम मासिकाने ताज्या अंकाच्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘सुपरस्प्रेडर’ (time magazine cover superspreader) असा केला आहे. फोटो शेअर करताना नेटकरी “एका व्यक्तीचा सत्तेच्या लोभाची किंमत संपूर्ण मानवतेला चुकवावी लागेल का?” असा सवाल देखील देखील उपस्थित करताहेत.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही टाईम मासिकाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन टाईम मासिकाचा ताजा अंक शोधला. मात्र अशा प्रकारचा उल्लेख असणारा अंक आम्हाला बघायला मिळाला नाही. शिवाय मुख्य प्रवाहातल्या इतरही कुठल्या माध्यमामध्ये टाईम मासिकाने मोदींना ‘सुपरस्प्रेडर’ म्हंटल्या विषयीच्या बातम्या वाचायला मिळालया नाहीत.
टाईमचा ताज्या अंगावरील मुख्य स्टोरी पर्यावरणाविषयी असल्याचे आम्हाला आढळून आले. दरम्यान, भारतामधील कोरोनाच्या हाहाकारावर नैना बाजेक्कल यांचा ‘इंडिया इन क्रायसिस’ आणि राणा अय्युब यांचा ‘हाऊ मोदी फेल्ड अस’ हे दोन लेख मात्र या अंकात बघायला मिळतात.
त्यानंतर आम्ही व्हायरल फोटो व्यवस्थितरीत्या निरखून बघितला असता असे लक्षात आले की व्हायरल फोटोच्या कोपऱ्यात अंकाच्या तारखेचा उल्लेख जुलै १७, २००६ असा करण्यात आला आहे. त्यामुळे मग आम्ही ‘टाईम मासिका’चा जुलै २००६ सालचा अंक शोधला. आम्हाला जो अंक सापडला, त्या अंकाचे कव्हर आणि व्हायरल फोटोचे कव्हर यात बरेच साम्य असल्याचे आढळले. म्हणजेच सध्या व्हायरल होत असलेला फोटो हा जुलै २००६ मधल्या अंकाचे कव्हर एडिट करून बनविण्यात आला आहे.
‘सुपरस्प्रेडर’ हा शब्द आला कुठून?
नरेंद्र मोदींसाठी ‘सुपरस्प्रेडर’ हा शब्द वापरला आहे देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच कोरोनाचे ‘सुपरस्प्रेडर’ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कोरोना विषाणू संदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करायला मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी कोरोनासंदर्भातील सर्व नियम मोडले, असे डॉ. दाहिया यांनी म्हंटले आहे.
देशातील डळमळीत आरोग्य सेवा आणि कोरोनाच्या विरोधात केंद्र सरकारच्या फसलेल्या नियोजनावर टीका करत नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे कोरोनाचा फैलाव होण्यास कशा प्रकारे मदत झाली हे सांगताना मोदी हेच कोरोनाचे ‘सुपरस्प्रेडर’ असल्याचे डॉ. दाहिया यांनी म्हंटले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये स्पष्ट झाले आहे की ‘टाईम’ मासिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘सुपरस्प्रेडर’ (time magazine cover superspreader) म्हंटलेलं नाही. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एडिटेड आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी कोरोनाच्या प्रसारासाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवत त्यांना ‘कोरोनाचे सुपरस्प्रेडर’ म्हंटले आहे.
हे ही वाचा- योगी सरकारने पसरवल्या ‘हार्वर्ड विद्यापीठा’ने उत्तम कामगिरीची दखल घेतल्याच्या चुकीच्या बातम्या!
Be First to Comment