Press "Enter" to skip to content

कॉलेजने जीन्सवर बंदी घातली म्हणून या मुली लुंगी परिधान करून कॉलेजला आल्या? जाणून घ्या सत्य!

सोशल मीडियावर लुंगी परिधान केलेल्या मुलींचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की केरळमधील कॉलेजने जीन्सवर बंदी घातल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात कॉलेजमधील मुली लुंगी परिधान करून (jeans ban lungi) कॉलेजला आल्या. लुंगी हा केरळच्या पारंपरिक पोशाखाचा भाग असल्याने या  मुलींनी निर्णयाला विरोध करण्यासाठी हा मार्ग निवडला.

Advertisement

माजी खासदार आणि पत्रकार शाहिद सिद्दीकी यांनी हा फोटो ट्विट केलाय. त्यांनी ट्विट केलेला फोटो साधारणतः १२०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय. रिट्विट करणाऱ्यांमध्ये आयपीएस अधिकारी आर.के. वीज यांचा देखील समावेश आहे.

अर्काइव्ह पोस्ट 

चित्रपट निर्मात्या आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या माजी व्यवस्थापकीय संपादक प्रिया गुप्ता यांनी देखील आपल्या व्हेरीफाईड ट्विटर प्रोफाईलवरून हा फोटो शेअर केलाय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी :

व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही तो रिव्हर्स सर्च केला त्यावेळी समजलं की हा फोटो आताचा नाही. ही घटना जवळपास पाच वर्षांपूर्वीची आहे. आमच्या पडताळणीमध्ये आम्हाला फिल्मी फोकस या युट्यूब चॅनेलवर १३ ऑगस्ट २०१५ रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ मिळाला.

या व्हिडीओमधील माहितीनुसार हा फोटो केरळमधला नसून थेट अमेरिकेतला आहे. २०१५ मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांचा ‘श्रीमानथुडु’ नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील ‘जागो जागो रे’ गाण्यात महेश बाबू यांनी लुंगी घातली होती. त्यानंतर त्यांच्या अमेरिकेतील चाहत्या मुलींच्या ग्रुपने लुंगी परिधान करून महेश बाबूप्रमाणे वेशभूषा केली होती.

आमच्या पडताळणी दरम्यान आमच्या असेही लक्षात आले की २०१६ साली देखील हा फोटो याच दाव्यासह व्हायरल झाला होता. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने देखील हा फोटो ट्विट केला होता. त्यावेळी देखील अनेक माध्यमांनी व्हायरल फोटोचे सत्य उलगडवून सांगितले होते.

अर्काइव्ह पोस्ट

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर केरळचा म्हणून व्हायरल होणारा फोटो भारतातला देखील नसून तो अमेरिकेतील आहे. शिवाय हा फोटो आताचा नसून ५ वर्षांपूर्वीचा आहे.

व्हायरल फोटोचा आणि जीन्सबंदीचा (jeans ban lungi) काही एक संबंध नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या चाहत्यांकडून त्यांच्याप्रतीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा फोटो काढण्यात आला होता. तो आता चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

हे ही वाचा- युपीएससी टॉपर मुलगी वडिलांना रिक्षात बसवून फिरवत असलेल्या व्हायरल फोटोचे सत्य वेगळंच!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा