Press "Enter" to skip to content

जागतिक आरोग्य संघटनेने पिशवीतल्या दुधामुळे ८७% भारतीय कॅन्सरग्रस्त होणार असल्याचा इशारा दिलाय?

सोशल मीडियात एका वृत्तपत्राचे कात्रण जोरदार व्हायरल होतेय. ‘पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे ८७ टक्के भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सर ने ग्रस्त होतील-‘जागतिक आरोग्य संघटना’ अशा मथळ्याखालील बातमी यामध्ये बघायला मिळतेय. त्याखाली सबहेडिंग मध्ये असेही लिहिलेय की ‘गेल्या अनेक दिवसांपासून ही माहिती जनतेपासून लपवून ठेवली आहे. आजच सावध व्हा!’

Advertisement
Source: Whatsapp

फेसबुकवर हे कात्रण मोठ्या प्रमाणात शेअर केले जातेय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने शोध घेतला असता २०१८-१९ सालच्या काही बातम्या आम्हाला सापडल्या.

‘ऍनिमल वेल्फेअर ऑफ इंडिया’ (Animal welfare board of India)या संस्थेचे सदस्य मोहनसिंह अहलूवालिया (Mohan Singh Ahluwalia) यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने दावा केला होता की ‘२०२५ सालापर्यंत भेसळयुक्त पिशवीच्या दुधामुळे भारतातील तब्बल ८७% जनता कॅन्सर सारख्या भयंकर आजाराची शिकार होऊ शकते.’ यावर विविध माध्यमांनी बातम्यासुद्धा केल्या होत्या.

या एकूणच प्रकारावर केंद्रीय आरोग्य विभागाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या व अन्नसुरक्षेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याविषयी काम करणाऱ्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या संस्थेने २७ नोव्हेंबर २०१८ रोजी एक पत्रक जारी केले. या पत्रकानुसार हे दावे निखालस खोटे आणि चुकीचे असल्याचे सांगण्यात आले होते.

WHO ने अशा प्रकारचा कुठलाही सावधतेचा इशारा दिला नसल्याचेही सांगितले. ज्या ज्या माध्यमांनी अशा प्रकारच्या प्रसिद्ध केल्या त्यांनी एकदाही FSSAI अथवा WHO कडे पडताळणी न करता थेट बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत असेही त्यात म्हंटले आहे.

सदर दावे चुकीचे असून ते ना नागरिकांच्या भल्याचे आहेत, ना व्यवसायाच्या. या दाव्यांचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर आणि व्यापारावर तर होईलच परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशाच्या खाद्य उत्पादनांची विश्वासार्हता धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल (Pawan Agarwal) यांनी दिली होती.

Source: FSSAI

आम्ही अहलुवालिया यांना त्यांच्या या अशा दाव्यांविषयी प्रश्न विचारले तेव्हा ते निरुत्तर झाले. शिवाय ‘ऍनिमल वेल्फेअर ऑफ इंडिया’ या संस्थेच्या अध्यक्षांकडे अहलुवालिया यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे देखील अग्रवाल यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते.

WHO ने व्हायरल दाव्याप्रमाणे कुठलाही इशारा दिला नसला तरीही दुधातील भेसळ (Milk adulteration) आपल्यासाठी नवीन नाही. दुधात पाणी मिसळले जाते हे सर्वश्रुत आहे परंतु काहीजण त्यात धुण्याचा सोडा, युरिया, साखर, स्टार्च इत्यादी गोष्टींची देखील भेसळ करतात. दुधातील भेसळ तपासण्यासंबंधीच्या सोप्या पद्धती विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आपण FSSAI च्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की WHOने पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे ८७ टक्के भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सरग्रस्त होतील असा सावधतेचा इशारा दिल्याचे दावे फेक आहेत.

ज्या मोहनसिंह अहलूवालिया यांच्यामुळे सदर दावे पसरले गेले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ संस्थेने केंद्राकडे केली होती.

हेही वाचा: मुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा