केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या (Agneepath Scheme) घोषणेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये त्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. अशातच सोशल मीडियावर एकमेकांशेजारी पडलेल्या 2 मृतदेहांचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो अग्निपथ योजनेच्या संदर्भाने व्हायरल होतोय.
फोटो शेअर करताना दावा करण्यात येतोय की सहारनपूरमधील दोन भाऊ सैन्यात भरती होण्यासाठी अगदी तंदुरुस्त होते. मात्र आता अग्निपथ योजनेमुळे त्यांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नसल्याने त्यांनी सोबतच आत्महत्या केली आहे.
पडताळणी:
व्हायरल व्हिडीओ रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता IndiaTv च्या वेबसाईटवर 13 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो वापरण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. विदर्भात 72 तासांच्या आत 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याला नोटीस बजावली होती. यासंदर्भातील बातमीमध्ये हा फोटो वापरण्यात आला होता.
पर्माकल्चर न्यूजच्या वेबसाईटवर 26 जानेवारी 2010 रोजी आंध्र प्रदेशातील शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात प्रसिद्ध बातमीमध्ये देखील हाच फोटो वापरण्यात आला होता.
IndiaTv आणि पर्माकल्चर न्यूज दोहोंच्या बातम्यांमध्ये फोटो नेमका कधीचा आणि कुठला आहे, याविषयीची माहिती मिळत नाही. शेतकरी आत्महत्यांविषयीच्या बातम्यांमध्ये प्रातिनिधिक फोटोच्या स्वरूपात हा फोटो वापरण्यात आलेला आहे. दरम्यान, या बातम्या दहा वर्षांपूर्वीच्या असल्याने या फोटोचा सध्याच्या अग्निपथ योजनेशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. या फोटोचा केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेशी काहीही संबंध नाही.
फोटो नेमका कधीचा आणि कुठला आहे याविषयीची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळू शकली नाही. मात्र हा फोटो साधारणतः दहा किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपूर्वीच्या शेतकरी आत्महत्यांसंबंधीच्या बातम्यांमध्ये हा फोटो वापरण्यात आलेला आहे.
हेही वाचा- सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात उतरल्या यूपीएससी टॉपर श्रुती शर्मा? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment