मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) सोबत चालताना दिसताहेत. मध्येच एक व्यक्ती येऊन कुठल्याशा कारणाने शिवराज सिंह चौहान यांना बाजूला घेतोय आणि पंतप्रधान मोदी तसेच पुढे निघून जातात.
मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ ”हम मुख्यमंत्री के साथ हुये इस बर्ताव की निंदा करते हैं।” अशा कॅप्शनसह शेअर केला गेलाय.
शिवराज सिंह चौहान हे पंतप्रधान मोदी आणि कॅमऱ्याच्या मध्ये येत असल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तीने चौहान यांना बाजूला होण्यास सांगितल्याचा दाव्यासह देखील हा व्हिडीओ शेअर केला जातोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रकाशभाऊ जगताप यांनी सदर व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या संदर्भाने केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पडताळणीसाठी अधिक शोध घेतला असता आम्हाला एनडीटीव्हीचे पत्रकार अनुराग द्वारी यांची फेसबुक पोस्ट मिळाली. या पोस्टमध्ये अनुराग द्वारी यांनी व्हायरल व्हिडीओ देखील शेअर केलाय.
व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ते लिहितात, “सोशल मीडियावर सकाळपासून हा व्हिडिओ व्हायरल आहे. ज्यांना ओळखत होतो, त्यांना सांगितलंय की व्हिडिओत मुख्यमंत्र्यांना थांवणारी व्यक्ती पंतप्रधान कार्यालयातील नाही, तर ते भोपाळचे जिल्हाधिकारी आहेत. भोपाळचे जिल्हाधिकारी काही कारणावरून मुख्यमंत्र्यांना बोलायला आले होते. सोशल मीडियावर बातम्या अशाच व्हायरल होतात! असं वाटतंय की तथ्यांचं कुणालाच काही पडलेलं नाही. फक्त काहीतरी सिद्ध करण्याची घाई आहे!
व्हिडीओ नेमका कुठला ?
एनडीटीव्ही इंडियाच्या रिपोर्टनुसार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील जंबूरी मैदानावर भगवान बिरसा मुंडा (Birsa Munda) यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहिले होते. व्हायरल व्हिडीओ याच कार्यक्रमातील आहे. व्हिडिओत मुख्यमंत्र्यांचा हात धरलेले अधिकारी भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केले जात असलेले दावे चुकीचे आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पंतप्रधान कार्यालयातील व्यक्तीने नव्हे, तर काही कामासाठी म्हणून भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बाजूला घेतले होते.
हेही वाचा- डेंग्यू पिडीताला भेटायला गेलेले अखिलेश यादव बसण्यासाठी सोबत सोफा घेऊन गेले?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment