Press "Enter" to skip to content

‘मोदी नव्हे, हिंदू हारले’ म्हणत बंगाल व अन्य राज्यांत मुस्लिम आमदारांचा टक्का वाढल्याच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य?

नुकतेच प.बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या चार राज्यांच्या आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. प.बंगाल, केरळ आणि आसाममध्ये त्या-त्या राज्यातील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता राखली, तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सत्तापालट झाल्याचे बघायला मिळाले.

Advertisement

केंद्रातील सत्ताधारी भाजपने आसाममधील सत्ता राखली असली तरी प्रयत्नांची प्रचंड पराकाष्ठा करून देखील भाजपला बंगालमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. शिवाय केरळच्या राजकारणात देखील भाजपचा पुरता सफाया झाला. तामिळनाडूमध्ये एआयडीएमकेच्या साथीत निवडणूक लढणाऱ्या भाजपला पराभवाचे तोंड बघायला लागले. अशा परिस्थितीत बंगालचा पराभव जीवाशी लागलेल्या भाजप समर्थकांकडून सोशल मीडियावर सामाजिक ध्रुवीकरण करणारे मेसेजेस पसरविले जाताहेत.

भाजप समर्थकांकडून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या मुस्लिम उमेदवारांची यादी फिरवली जातेय. दावा करण्यात येतोय की विधानसभा निकालांमध्ये विजयी मुस्लिम उमेदवारांचा टक्का वाढला असून हा पराभव मोदींचा नसून हिंदूंचा आहे. सर्व हिंदू एकत्र आले नाही, तर देश देखील गमवावा लागेल.

“चिंता ना किजीए… मोदीजी नही हारे है… हम हिंदू हारे है… एक नही होंगे, तो देश भी हारेंगे…” या कॅप्शनसह शेअर केल्या जाणाऱ्या मोठ्या यादीच्या माध्यमातून देशातील हिंदू मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले जातेय. 

चिंता ना किजीए… मोदीजी नही हारे है… हम हिंदू हारे है… एक नही होंगे, तो देश भी हारेंगे…ममता बॅनर्जी TMC के,…

Posted by Hindu Army Najafgarh on Monday, 3 May 2021

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात असलेल्या या दाव्या-प्रतिदाव्यांच्या पडताळणासाठी आम्ही सर्व राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या मुस्लिम उमेदवारांच्या आकडेवारीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जो निष्कर्ष समोर आला तो येथे वाचकांसमोर मांडण्यात येतोय.

१. पश्चिम बंगाल

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार पश्चिम बंगालच्या २९२ विधानसभा सदस्यांमध्ये यावेळी ४४ आमदार हे मुस्लिम समाजाचे असणार आहेत. मावळत्या विधानसभेत मुस्लिम समाजाचे ५९ आमदार होते. म्हणजेच यावर्षी बंगाल विधानसभेतील मुस्लिम आमदारांची संख्या १५ आमदारांनी घटली आहे. 

बंगालच्या लोकसंख्येत मुस्लिम मतदारांचे प्रमाण ३० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मुस्लिम लोकसंख्येचा विचार करता मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही, असे देखील म्हंटले जाऊ शकते.

२. आसाम आणि केरळ

आसाम विधानसभेच्या १२६ आमदारांमध्ये यावर्षी ३१ आमदार हे मुस्लिम धर्मीय आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा २ ने वाढलेला दिसेल. गेल्या विधानसभेत आसाम विधानसभेतील मुस्लिम आमदारांची संख्या २९ इतकी होती, अशी माहिती ‘द हिंदू’च्या रिपोर्टमध्ये वाचायला मिळते.

विशेष म्हणजे आसामच्या लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण बघून भाजपने देखील ८ मुस्लिम उमेदवारांना पक्षाचे तिकीट दिले होते. मात्र यापैकी कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.

केरळच्या १४० सदस्यांच्या विधानसभेत यावर्षी ३२ मुस्लिम प्रतिनिधी असणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुस्लिम आमदारांची संख्या गत विधानसभेच्या २९ सदस्यांच्या तुलनेत ३ ने वाढली आहे. केरळच्या विधानसभेतील ३२ पैकी १५ उमेदवार हे मुस्लिम लीगचे आहेत.

३.  तामिळनाडू आणि पुद्दुचेरी

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील मुस्लिम लोकप्रतिनिधींच्या संख्येत गेल्या विधानसभेच्या तुलनेत कसलाही बदल झालेला नाही. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये गेल्या विधानसभेत अनुक्रमे ५ आणि १ मुस्लिम आमदार होते. नवीन विधानसभेत देखील ही संख्या तितकीच असणार आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की विधानसभा निवडणुकांमधील विजयी मुस्लिम उमेदवारांचा टक्का वाढल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत.

केरळ आणि आसाममध्ये मुस्लिम उमेदवारांची संख्या ३ आणि २ आमदारांनी वाढली असली तरी या दोन्ही राज्यातील मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लीमांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व कमीच आहे, असे म्हणता येईल.

बंगालमध्ये तर यावर्षी मुस्लिम प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात घटले असून तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये मात्र संख्या ना वाढली आहे ना घटली आहे. ती आहे त्या प्रमाणात कायम आहे. 

हे ही वाचा- ‘तब्लीगी जमात’ कोरोना काळात फेकन्युजमुळे ‘बळीचा बकरा’ ठरली का? वाचा स्पेशल रिपोर्ट!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा