अभिनेत्री कंगना राणावतने राजपथावरील दिल्लीच्या झाकीचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये अजान ऐकायला मिळतेय. (Azan in delhi’s republic day tableau) व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कंगना म्हणते, ‘दिल्ली ना सेक्युलर है ना टॉलरन्ट’ चित्ररथातून हेच सिद्ध झालं की दिल्ली बादशाहाची आहे. या अशा काळात ‘जय हिंद’चा दावा करण्याची खरी वेळ आलीय’.
नरेंद्र मोदी फॅन क्लब नावाच्या ट्विटर हँडलवरून ‘पोलिटिकल किडा’चे ट्विट शेअर करण्यात आले आहे. यामध्ये एक व्हिडीओ असून त्यात उत्तर प्रदेशचा चित्ररथ रामाचे गीत गातोय आणि दिल्लीचा चित्ररथ अजान वाजवत असल्याचे (Azan in delhi’s republic day tableau) दिसत आहे. यातून केजरीवाल आणि योगी यांचा धार्मिक कल दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
पडताळणी:
काल २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यासमोर राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथ सादर झाले. यापैकीच दिल्लीच्या चित्ररथाविषयी दावे व्हायरल होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुस्लीम धार्जिणे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. याची पडताळणी करण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’ने राजपथावरील कालच्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ शोधला.
‘दूरदर्शन नॅशनल’ या सरकारी वाहिनीच्या युट्युब चॅनलवरून कालच्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओच्या १ तास ५६ व्या मिनिटाला दिल्लीचा चित्ररथ येताना दिसतोय. यावर लाल किल्ल्याची प्रतिकृती असून सर्वात आधी खरोखर अजान ऐकू येतेय. पण ती संपतेय तोच ‘एक ओंकार’ ही शीख धर्मीय प्रार्थना कानी येते आणि त्यानंतर चर्चवरील घंटेचा आवाज येतोय.
हा चित्ररथ व्यवस्थित पाहिला तर गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद आणि चर्च या सर्वांच्या प्रतिकृती दिसतील. यातून अरविंद केजरीवाल यांचे मुस्लीम धार्जिणे असणे नव्हे तर दिल्लीचा सर्वधर्मसमभाव दिसून येतोय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये कंगना राणावत आणि इतर नेटकऱ्यांनी दिल्लीच्या चित्ररथाचा अर्धवट व्हिडीओ व्हायरल करून अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला मुस्लीमधार्जिणे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण व्हिडीओतून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला गेलाय.
हेही वाचा: शिवसेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी कंगनाने घेतला ‘फेकन्यूज’चा आधार!
Be First to Comment