सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक तरुण एका जेष्ठ व्यक्तीला भाजपला पाठिंबा देण्यासाठी धमकावत असल्याचे बघायला मिळतेय. व्हिडिओमध्ये जेष्ठ व्यक्तीला धमकवणारा तरुण भाजप नगरसेवक राघवेंद्र मिश्रा असल्याचे सांगण्यात येतेय.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘हिंदुत्ववादियों की राजनीति यानि गुंडागर्दी।’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ रिट्विट केलाय.
समाजवादी पक्षाचे नेते ब्रजेश यादव यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केलाय.
पडताळणी:
राहुल गांधी यांनी ज्या अरविंद चौहान यांचं ट्विट रिट्विट केलंय, त्यांनीच आपल्या ट्विटच्या रिप्लायमध्ये दुसरा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओतील तरुण आणि वृद्ध व्यक्ती दोघेही बघायला मिळताहेत.
व्हिडिओमधील वृद्ध व्यक्ती स्वतःच असं सांगताहेत की आमच्यात कसलेही वाद-विवाद नाहीत. व्हिडीओ थट्टामस्करीमध्ये शूट करण्यात आला होता. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. यांच्या वडिलांशी आमचे खूप चांगले संबंध होते. सदर तरुण सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय की भागातील सर्वांशीच आपले चांगले संबंध असून आपण अनेकांशी थट्टामस्करी करत असतो.
पडताळणी दरम्यान आम्हाला पोलीस आयुक्तालय कानपूर नगर यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलेला व्हिडीओ देखील मिळाला. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून देखील व्हिडिओसोबत केल्या जात असलेल्या दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे.
व्हिडीओ कानपूरमधील गोविंदनगर विधानसभा क्षेत्रातील आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या तरुण व्यक्तीचे नाव राघवेंद्र मिश्रा (Raghvendra Mishra) असून वृद्ध व्यक्तीचे नाव भूपेंद्र सिंग भदौरिया आहे. चौकशीदरम्यान दोहोंमध्ये कौटुंबिक संबंध असल्याची माहिती भूपेंद्र सिंग भदौरिया यांनी दिली असल्याचे पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप नेत्याने पक्षात प्रवेश करण्यासाठी जेष्ठ व्यक्तीला धमकावल्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही व्यक्तींमध्ये कसल्याही प्रकारचा विवाद नसून त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याचे व्हिडिओतील जेष्ठ व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे. थट्टामस्करीमध्ये बनविण्यात आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होत आहे.
हेही वाचा- उत्तर प्रदेशात मते मागायला आलेल्या भाजप नेत्यास जनतेकडून बेदम मारहाण? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment