ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नचे (Shane Warne) ४ मार्च २०२२ रोजी निधन झाले. त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा मित्र माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) भारतात आला आणि त्याने वाराणसी घाटावरून शेन वॉर्नच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या, अशा प्रकारचे दावे दैनिक लोकसत्ताच्या एका बातमीच्या कात्रणासह सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
लोकसत्ताच्या ‘माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने मित्राची शेवटची इच्छा केली पूर्ण, हिंदू मान्यतेनुसार अस्थिचं गंगेत विसर्जन’ अशा मथळ्याच्या बातमीचे कात्रण आणि त्यावर ‘ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न स्वतःच्या अस्थि गंगेत विसर्जित करण्यास सांगून जातो आणि इथे काही लोक स्वतःच्या धर्म, संस्कृती, चालीरीती आणि परंपरा यांना नावं ठेवण्यात धन्यता मानतात. हिंदुसंस्कृती सनातन भारत’ असे लिहून शेअर केले जात आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. राहुल पाटील यांनी व्हायरल दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी व्हायरल दाव्यामध्ये वापरली गेलेली लोकसत्ताची बातमी शोधून काढली. लोकसत्ताच्या वेबसाईटवर १४ मार्च २०२२ रोजी ही बातमी अपडेट करण्यात आली आहे. या बातमीचा मथळा आणि त्यात वापरलेला फोटो व्हायरल दाव्यातील कात्रणाशी तंतोतंत जुळणारा आहे. परंतु आम्ही जेव्हा संपूर्ण बातमी वाचली तेव्हा असे लक्षात आले की ‘स्टीव्ह वॉ’ने विसर्जित केलेल्या अस्थी शेन वॉर्नच्या नसून ब्रायन नावाच्या व्यक्तीच्या होत्या.
लोकसत्ताच्या बातमीतील ‘स्टीव्ह वॉ’ची प्रतिक्रिया:
ही घटना २०१७ सालची:
लोकसत्ताने १४ मार्च २०२२ रोजी बातमी अपडेट केलेली असली तरीही ‘स्टीव्ह वॉ’ने नेमक्या कोणत्या तारखेला हे अस्थी विसर्जन केले याचा उल्लेख नाही. गुगल सर्च केले असता आम्हाला विविध माध्यमांच्या या विषयीच्या बातम्या मिळाल्या. या सर्व बातम्या २०१७ सालच्या आहेत.
डेक्कन हेराल्डच्या १० मार्च २०१७ रोजीच्या बातमीनुसार ब्रायन हा सिडनीमधील बूट पॉलिश करणारा व्यक्ती होता. याच्याशी स्टीव्ह वॉचे ऋणानुबंध जुळले. ब्रायनला हिंदू धर्माविषयी आस्था होती. त्यामागे कुणीही नातलग नव्हते म्हणून नेहमी प्रमाणे दान कर्मासाठी कोलकत्त्याला आलेल्या स्टीव्ह वॉने वाराणसीत जाऊन ब्रायनची शेवटची इच्छा पूर्ण करत स्वतः त्याचे अस्थी विसर्जन गंगेत केले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल होत असलेले दावे फेक आहेत. क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने २०१७ साली त्याचा मित्र ब्रायनची शेवटची इच्छा म्हणून गंगेत अस्थी विसर्जन केले होते. तोच फोटो वापरून शेन वॉर्नची शेवटची इच्छा म्हणून स्टीव्ह ने गंगेत अस्थी विसर्जन केल्याचे दावे व्हायरल केले जातायेत.
हेही वाचा: कुर्ला स्टेशनच्या फलाटावरील मुस्लीम अंत्ययात्रेच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment