Press "Enter" to skip to content

राजीव गांधींच्या रक्षणासाठी SPG ने चुकून एका भिकाऱ्याला गोळ्या घातल्या?

माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या 1986 मध्ये राजघाट भेटीचा असोसिएटेड प्रेसच्या कव्हरेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दावा केला जातोय की पंतप्रधानपदावर विराजमान असलेले राजीव गांधी राजघाटावर प्रार्थनेसाठी गेले असता झुडपात हालचाल होताना आढळून आली. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या SPG अधिकाऱ्यांना झुडुपांमध्ये एक व्यक्ती दिसली. सुरक्षारक्षकांनी कुठलाही विचार न करता गोळीबार केला. नंतर लक्षात आपले की झुडुपांमधील ती व्यक्ती भिकारी होती.

Advertisement

भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष आणि अजमेर महापालिकेचे उप-महापौर नीरज जैन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा ट्विट केलाय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पडताळणी:

गुगलवर किवर्ड सर्चच्या आधारे शोध घेतला असता यूट्यूबवर असोशिएटेड प्रेसच्या अर्काइव्ह चॅनेलवर व्हायरल व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, घटना 2 ऑक्टोबर 1986 रोजीची असून भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी एका शीख इसमाने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. तो व्यक्ती पकडला गेला आणि राजीव गांधींना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘लॉस ऐंजलिस टाईम्स’च्या वेबसाइटवर या घटनेच्या सविस्तर बातम्या बघायला मिळाल्या. बातम्यांनुसार राजघाटावर पंतप्रधान राजीव गांधींवर ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी घटनास्थळी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग (Giani Zail Singh) आणि केंद्रीय गृहमंत्री सरदार बुटा सिंग (Sardar Buta Singh) हेही उपस्थित होते. या हल्ल्यामध्ये तीन नागरिक आणि तीन पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले होते.

Source:los angeles times

हल्लेखोराने अवघ्या 20 फूट अंतरावरून राजीव गांधींवर गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या बंदूकधारी व्यक्तीने सर्वप्रथम स्वतःची ओळख मनमोहन देसाई (Manmohan Desai) अशी सांगितली होती, परंतु चौकशीदरम्यान त्याने अनेक वेळा स्वतःचे नाव बदलले.

‘इंडिया टूडे’च्या ऑक्टोबर 1986 सालच्या अंकातील रिपोर्टमध्ये घटनेची सविस्तर माहिती वाचायला मिळते. रिपोर्टनुसार राजीव गांधींवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव करमजित सिंह (Karamjit Singh) होते. हल्ल्यानंतर SPG अधिकाऱ्यांनी ज्यावेळी करमजित सिंहला घेरले, त्यावेळी त्याने शरणागतीची तयारी दर्शविली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी करमजित सिंहला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते, मात्र दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त गौतम कौल (Gautam Kaul) यांनी गोळीबार न करण्याचे आदेश दिले. गौतम कौल यांना हल्लेखोर करमजित सिंह जिवंत ताब्यात हवा होता.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे पंजाब सेलचे प्रभारी आणि सीबीआयचे तत्कालीन सहसंचालक शांतनू सेन यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती. शांतनू सेन या घटनेविषयी TV9 शी बोलताना सांगतात,

“माझ्या तपास अहवालाच्या आधारे, प्रकरणातील आरोपी करमजीत सिंहला 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तो पंजाबचा रहिवासी होता. श्रीमती गांधींच्या (इंदिरा गांधी) हत्येनंतर देशभरात खळबळ उडालेली असताना दिल्लीत जमावाने करमजितच्या एका मित्राची हत्या केली होती. याच हत्येचा बदला घेण्यासाठी करमजितने राजीव गांधींच्या हत्येचा प्रयत्न केला होता”

न्यायालयीन सुनावणीनंतर करमजीतला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मे 2000 मध्ये त्याने आपली शिक्षा पूर्ण केली आणि 2009 मध्ये काँग्रेस उमेदवार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्या पत्नी परनित कौर (Parnit Kaur) यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकही लढवली, मात्र त्याचा पराभव झाला.

संपूर्ण घटनाक्रम आणि त्यानंतरच्या प्रवासाबद्दल एप्रिल 2009 मध्ये सिफीडॉटकॉमला दिलेल्या मुलाखतीत करमजीत सांगतो,

“तीन गोळ्या झाडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मला पकडले. चौकशी झाली. 56 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यामध्ये खूप छळ करण्यात आला. राजीव गांधीही दोनदा भेटायला आले. दोन्ही वेळा ते एकच गोष्ट बोलले की जर माफी मागशील तर माफ केले जाईल. पण मी नकार दिला. न्यायालयाने शिक्षाही केली, पण चांगल्या वागणुकीमुळे 2 मे 2000 रोजी माझी सुटका झाली. तुरुंगात असताना मी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मात्र तुरुंग प्रशासनाने कायद्याचे शिक्षण घेण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी लग्न केले आणि त्यानंतर एल.एल.बी. पूर्ण केले”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. राजीव गांधींच्या रक्षणासाठी SPG ने चुकून एका भिकाऱ्याला गोळ्या घातल्या नव्हत्या, तर सदर व्यक्तीने राजीव गांधींच्या हत्येच्या उद्देश्याने त्यांच्यावर गोळीबार केला होता. सदर व्यक्तीला पोलिसांनी जिवंत ताब्यात घेतले होते.

हेही वाचा- खलिस्तान जिंदाबादचे नारे लावणारी बाईक रॅली पंतप्रधान मोदींवर चालून येत होती?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा