Press "Enter" to skip to content

व्लादिमिर पुतीन यांनी स्वतः एअर इंडियाच्या विमानात जाऊन भारतीय विद्यार्थ्यांची विचारपूस केली?

युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरित्या देशात परत आणण्यासाठी सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga)चालविण्यात येत आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका विमानात बसलेले काही विद्यार्थी दिसताहेत आणि एक व्यक्ती विमानात प्रवेश करत असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की विमानात प्रवेश करणारी ही व्यक्ती रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) असून त्यांनी स्वतः एअर इंडियाच्या विमानात जाऊन भारतीय विद्यार्थ्यांच्या ख्याली-खुशालीची चौकशी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला.

Advertisement
Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित बघितला तरी विमानात विद्यार्थ्यांशी संवाद साधणारी व्यक्ती व्लादिमिर पुतीन नाही, हे स्पष्ट होते. विमानात प्रवेश करून विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या व्यक्तीने संवादाची सुरुवातच “नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल श्रीवास्तव आहे” अशी केली आहे. राहुल श्रीवास्तव (Rahul Shrivastava)  हे रोमानियातील भारतीय राजदूत आहेत.

डीडी न्यूजच्या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आलेल्या बातमीमध्ये देखील रोमानियातील भारतीय राजदूत राहुल श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओ रोमानियातील असून युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियाहून मुंबईला एअर इंडियाच्या विमानाने एअरलिफ्ट करण्यात आले होते. त्यावेळी विमानाच्या उड्डाणापूर्वी राहुल श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

ANI ने 26 फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ ट्विट केला होता. भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण भारत सरकार अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे भारताचे रोमानियातील राजदूत राहुल श्रीवास्तव यांनी म्हटले असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले होते.

विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल श्रीवास्तव म्हणतात,

“मला ह्या गोष्टीची कल्पना आहे की तुम्ही सगळे खूप लांबचा प्रवास करून आला आहात. तुम्ही तुमच्या घरी पोहोचण्यासाठी उत्सुक आहात. तिथे तुमचे कुटुंबिय, तुमचे मित्र तुमची वाट बघताहेत. पण घरी पोहोचल्यानंतर देखील या गोष्टीची जाणीव असूद्यात की तुमचे काही मित्र अजूनही येथे आहेत आणि ते देखील परत जाण्याची वाट बघताहेत. त्यांना सांगा की भारत सरकारची संपूर्ण टीम प्रत्येकाला येथून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.”

राहुल श्रीवास्तव शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात आणि म्हणतात,

“यापुढे आयुष्यात  कुठलेही संकट आले तर हा दिवस…26 फेब्रुवारी आठवा.. सगळं काही ठीक होईल”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्लादिमिर पुतीन यांनी स्वतः एअर इंडियाच्या विमानात जाऊन भारतीय विद्यार्थ्यांची विचारपूस केल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडिओतील भारतीयांशी संवाद साधणारी व्यक्ती रोमानियातील भारतीय राजदूत राहुल श्रीवास्तव आहेत.

हेही वाचा- रशियन सैन्याने सामान्य नागरिकांवर हल्ले केल्याचे दर्शवण्यासाठी जिवंत लोकांना चादरी पांघरल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा