वरिष्ठ पत्रकार आणि आज तक वाहिनीचे अँकर रोहित सरदाना (rohit sardana) कोव्हीड पॉझिटिव्ह आढळले आणि उपचारादरम्यान हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. सरदाणा यांनी मृत्युपूर्वी अगदी रडवेल्या स्वरात आपल्या देशाला सरकार नाही, पंतप्रधान नाहीत असे म्हणत देशाची गंभीर परिस्थिती सांगणारा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. असे दावे करत सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
सातत्याने मोदी सरकारची भलामण करणारे, मरकज प्रकरणावेळी मुस्लीम समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या काही पत्रकारांपैकी रोहित सरदाना (rohit sardana) यांचेही नाव घेतले जाते. अशी प्रतिमा असणारी व्यक्ती रडवेल्या आवाजात हतबलता जाहीर करतेय आणि व्यवस्थेची हार दर्शवतेय हे पाहून व्हायरल व्हिडीओसह एक कॅप्शनसुद्धा व्हायरल होतेय.
“सरदानाजी बहुत देर कर दी आपने यह कहनेमे, शायद यही आवाज आप आपके चैनलके मध्यम से उठाते, तो शायद भारत का चित्र आज कुछ और अलग नजर आता. जाते समय तो आपने सही कहा. भावपूर्ण श्रद्धांजली!”
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी व्हायरल दावा आमच्या निदर्शनास आणून देत पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये समोर आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे-
१. व्हिडीओतील व्यक्ती रोहित सरदाना नाहीत
व्हायरल व्हिडीओच्या कोपऱ्यात असणाऱ्या लोगोवर ‘दो बोल’ असे लिहिलेले आहे. या अनुषंगाने सर्च केले असता ‘दो बोल’ नावाचा युट्युब चॅनल आम्हाला सापडला. यावर अपलोड झालेले सर्व व्हिडीओज तपासताना २६ एप्रिल २०२१ रोजी ‘मौत के मुंह से बाहर आये पत्रकार naveen kumar ने रोते रोते बयान किया देश का दर्द’ या कॅप्शनसह अपलोड केलेला व्हिडीओ सापडला. तो व्हिडीओ आणि व्हायरल व्हिडीओ तंतोतंत जुळणारा आहे.
म्हणजेच या युट्युब कॅप्शननुसार त्यातील व्यक्ती रोहित सरदाना नसून नवीन कुमार हे आहेत.
२. कोण आहेत नवीन कुमार?
नवीन कुमार हे आज तक, एबीपी, स्टार न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज एक्स्प्रेस, न्यूज २४ आणि सहारा समय यांसारख्या माध्यमांत काम केलेले वरिष्ठ पत्रकार आहेत. सध्या ते युट्युबवरील ‘आर्टिकल १९’ या चॅनलवरून आपला दृष्टीकोन मांडताना दिसतात. त्यांना २०१६ साली हिंदी अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत दिसणारी व्यक्ती दिवंगत पत्रकार रोहित सरदाना नसून नवीन कुमार हे आहेत.
नवीन कुमार देखील पत्रकार असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक चॅनेल्स मध्ये काम केलेले आहे. सध्या ते ‘आर्टिकल १९’ या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून स्वतंत्र पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
हे ही वाचा: लखनऊमधील कोविड सेंटरचा म्हणून ‘आज तक’ने वापरला दिल्ली सरकारच्या शाळेचा फोटो !
Be First to Comment