पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 17 जानेवारी रोजी जागतिक आर्थिक परिषदेच्या (World Economic Forum) दावोस अजेंडा 2022 शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींच्या याच भाषणातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या भाषणात काही व्यत्यय आल्याने त्यांना मध्येच भाषण थांबवायला लागल्याचे बघायला मिळतेय.
व्हिडीओ शेअर शेअर करताना अनेकांनी दावा केलाय टेलिप्रॉम्प्टर (Teleprompter) खराब झाल्याने भाषण करताना मोदींचा गोंधळ उडाला आणि पुढे काहीच बोलायचे न सुचल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे हसे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी टेलिप्रॉम्प्टरशिवाय भाषण करूच शकत नसल्याच्या दाव्यांसह अनेकांकडून पंतप्रधान मोदींची खिल्ली उडविण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून देखील #TelepromptorPM या हॅशटॅगसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला. राहुल गांधींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली.
वस्तुस्थिती:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टेलिप्रॉम्पटर बंद पडल्याने नव्हे, तर जागतिक आर्थिक परिषदेच्या बाजूने असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे भाषण थांबविले होते. फॅक्ट चेक वेबसाईट अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यानचा व्हिडीओ ट्विट केलाय.
व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा आवाज ऐकू येतोय. ही व्यक्ती पंतप्रधानांचे भाषण सुरु असतानाच पंतप्रधानांना सांगतेय की, “सर उनसे आप एक बार पूछें कि सब जुड़ गए क्या?” त्यानंतर पंतप्रधान मोदी जागतिक आर्थिक परिषदेचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांना विचारतात की त्यांचा तसेच अनुवादकाचा आवाज देखील स्पष्टपणे ऐकू येतोय का?
क्लॉस श्वाब हे पंतप्रधानांचा आणि अनुवादकाचा आवाज व्यवस्थित येत असल्याचे सांगतात आणि पंतप्रधानांना भाषण पुन्हा सुरु करण्याची विनंती करतात.
डीडी न्यूजच्या युट्यूब चॅनेलवर पंतप्रधानांच्या संपूर्ण भाषणाचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला भाषण सुरु करतात आणि त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे त्यांना भाषण थांबवावे लागल्याचे बघायला मिळतेय. नंतर परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र मोदींच्या छोट्याशा परिचयनानंतर अधिकृत सत्राची पुन्हा सुरुवात होईल असे सांगतात आणि नरेंद्र मोदी पुन्हा नव्याने भाषण सुरु करत असल्याचे बघायला मिळतेय.
डीडी न्यूजच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान 5 मिनिटे 10 सेकंद या वेळेपासून भाषण सुरु करतात. त्यानंतर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला भाग साधारणतः 7 मिनिटांपासूनचा बघायला मिळतोय. परिषदेचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांनी आवाज येत असल्याचे सांगितल्यानंतर ते थोडक्यात आपली प्रस्तावना मांडतात आणि नंतर साधारणतः 10 मिनिटे 49 सेकंदापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा नव्याने भाषणाची सुरुवात करतात.
यावरून हे स्पष्ट होतेय की पंतप्रधान मोदींनी टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने भाषण थांबवले नव्हते, तर जागतिक आर्थिक परिषदेच्या बाजूने असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधानांना भाषण थांबवावे लागले होते. भाषण नव्याने सुरु झाल्यानंतर पंतप्रधानांनी कुठल्याही अडचणीशिवाय जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण केले.
जागतिक आर्थिक परिषदेच्या युट्यूब चॅनेलवरून हेच विनाव्यतय पार पडलेले भाषण अपलोड करण्यात आले आहे.
हेही वाचा-राजीव गांधींच्या रक्षणासाठी SPG ने चुकून एका भिकाऱ्याला गोळ्या घातल्या?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment