पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये मोदी कुठल्याशा रस्त्यावरून चालताना दिसताहेत आणि एक फोटोग्राफर जमिनीवर लोटांगण घेऊन त्यांचा फोटो काढत असताना दिसतोय. दावा केला जातोय की स्वप्रतिमेच्या प्रेमातील पंतप्रधान मोदींनी आपल्या फोटोसाठी फोटोग्राफरला अंधाऱ्या रात्री पुन्हा पुन्हा जमिनीवर लोटांगण घ्यायला भाग पाडले.
काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक मनोज मेहता यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो ट्विट केलाय. ट्विटच्या कॅप्शनमध्ये ते लिहितात, “अपनी तस्वीर के लिए जो फोटोग्राफर को अंधेरे में बार बार जमीन पर लोटने को करता है मजबूर,, वह शख्स यकीनन होगा संवेदनहीन, पत्थरदिल व फ़क़त सत्ता के नशे में चूर… !!”
काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी देखील ‘फोटोग्राफर ऑफ द मंथ’ अशा कॅप्शनसह हा फोटो ट्विट केलाय. त्यांचं हे ट्विट २४०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट केलं गेलंय.
पडताळणी:
व्हायरल फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला दै. भास्करच्या वेबसाईटवर प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. मात्र या फोटोमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच बघायला मिळताहेत. फोटो घेण्यासाठी जमिनीवर लोटांगण घातलेला फोटोग्राफर मात्र यात दिसत नाही.
क्विन्ट हिंदीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमीमध्ये देखील हाच फोटो बघायला मिळतो. शिवाय या बातमीतील फोटोत देखील फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसताहेत. फोटोत कुठेही फोटो घेण्यासाठी जमिनीवर लोळण घेतलेला फोटोग्राफर नाही.
त्यानंतर आम्ही जमिनीवर लोटांगण घेतलेल्या फोटोग्राफरचा फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला पीएक्सफ्युएल या फोटो स्टॉक वेबसाईटवर तो फोटो बघायला मिळाला.
दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या फोटोजवरून हे स्पष्ट झाले की मूळ फोटोत फोटोग्राफर नाही. एडिटिंगच्या मदतीने जमिनीवर लोटांगण घातलेल्या फोटोग्राफरचा फोटो मोदींच्या फोटोसोबत जोडण्यात आला आहे.
फोटो नेमका कुठला?
भास्कर आणि क्विन्ट दोहोंमधील बातम्यांनुसार अमेरिकेतून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा (Central vista project) दौरा केला. मोदींनी कन्स्ट्रक्शन साइटवर साधारण एक तास घालवला. मोदींचा हा या प्रकल्पाचा पहिलाच दौरा होता आणि कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय ते कन्स्ट्रक्शन साइटवर पोहोचले होते.
वस्तुस्थिती:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टची पाहणी करतानाच जो खरा फोटो आहे त्याच्या अँगलनुसार याची शक्यता नाकारता येत नाही की फोटोग्राफरला एवढ्या खाली बसावं/ झोपावं लागलं असेल.
परंतु ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर विरोधकांनी व्हायरल केलेला मोदींचा फोटो एडिटेड आहे. मूळ फोटोत जमिनीवर लोटांगण घातलेला फोटोग्राफर नसून तो एडिटिंगच्या मदतीने मोदींच्या फोटोसोबत जोडण्यात आला आहे.
हेही वाचा- पंतप्रधान मोदींचे कुटुंबीय वडलांच्या मृत्यूसाठी मोदींनाच जबाबदार मानतात?
[…] आमची सविस्तर पडताळणी आपण ‘येथे’ वाचू […]