पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल फोटोत नरेंद्र मोदी भाजपच्या चार वेगवेगळ्या नेत्यांसोबत दिसताहेत. प्रत्येक नेत्यासोबतच्या भेटीत पंतप्रधानांच्या अंगावरील ड्रेस बदललेला दिसतोय.
‘काल दिवसभरात पंतप्रधान चार लोकांना भेटले…! चार वेळा कपडे बदलले… अठरा अठरा तास काम करतात ते…! गजब की फकिरी है….’ अशा कॅप्शनसह चार फोटोज पोस्ट केले जात आहेत.
ट्विटरवर देखील अशाच प्रकारचा दावा केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो सोबत केल्या जात असलेल्या दाव्यांच्या पडताळणीसाठी आम्ही चारही फोटो स्वतंत्ररित्या गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधले.
१. पहिला फोटो
पहिला फोटो आम्हाला पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर बघायला मिळाला. दि. १० जून २०२१ रोजी हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. फोटोच्या कॅप्शननुसार पंतप्रधान मोदींबरोबर दिसणारी महिला म्हणजे मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला (Najma Heptulla) आहेत.
२. दुसरा फोटो
दुसऱ्या फोटोत पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिसताहेत. हा फोटो आम्हाला योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दि. ११ जून २०२१ रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.
योगी आदित्यनाथ यांनी ११ जून रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटी दरम्यानचा हा फोटो आहे. या दिल्ली दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली होती. या भेटीत उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले होते.
३. तिसरा फोटो
मोदींसोबत तिसऱ्या फोटोत दिसणारी व्यक्ती आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत. लोकसत्ताच्या वेबसाईटवर ८ जून २०२१ रोजी प्रकाशित बातमीत आम्हाला व्हायरल फोटो मिळाला. तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती.
४. चौथा फोटो
मोदींसमवेतच्या चौथ्या फोटोत दिसणारी व्यक्ती आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma). सरमा यांनी २ जून २०२१ रोजी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. याच भेटी दरम्यानचा हा फोटो आहे. सरमा यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून २ जून रोजीच हा फोटो अपलोड केला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या नेत्यांशी घेतलेल्या भेटीचे फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केले जाताहेत.
हे ही वाचा- ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर भारताचा विकास थांबेल, अमेरिकन उद्योगपतीने केलेली भविष्यवाणी?
Be First to Comment