नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभारण्यात (Kuno National Park) सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी या चित्त्यांची फोटोग्राफी देखील केली.
आता सोशल मीडियावर नरेंद्र मोदींचा एक फोटो व्हायरल होतोय. व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान मोदी चित्त्यांचा फोटो घेत असताना दिसताहेत. मात्र ज्या कॅमेऱ्याने मोदी फोटो घेताहेत, त्या कॅमेऱ्याच्या लेन्सवरचे कव्हर मात्र काढलेले नाही. मोदींचा हा फोटो शेअर करताना दावा केला जातोय की कॅमेऱ्याच्या लेन्सचे कव्हर न काढताच मोदी केवळ फोटोग्राफी करतानाची पोझ देताहेत.
महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो ट्विट करण्यात आलाय. काँग्रेस आणि विरोधी पक्षातील इतरही अनेक नेत्यांकडून हा फोटो शेअर करण्यात आलाय.
पडताळणी:
पंतप्रधान मोदींचा लेन्स कव्हर न काढताच फोटोग्राफी करतानाचा व्हायरल फोटो व्यवस्थित बघितला तरी तो फोटो एडिटेड आहे, हे लक्षात येईल. मोदींच्या हातातील कॅमेरा निकॉन या कंपनीचा आहे, तर कॅमेऱ्याच्या लेन्सवरील कव्हर कॅनन कंपनीचे असल्याचे बघायला मिळतेय. याचाच अर्थ फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे.
आम्ही पंतप्रधान मोदींचे चित्त्याची फोटोग्राफी करतानाचे माध्यमातील प्रसिद्ध फोटोज शोधले. ‘वन इंडिया’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमीमध्ये आम्हाला पंतप्रधानांचा चित्त्याची फोटोग्राफी करतानाचा फोटो बघायला मिळाला. या फोटोमध्ये कॅमेऱ्याच्या लेन्सवरील कव्हर काढलेले आहे.

बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल. हाच फोटो क्रॉप आणि एडीट करून त्यातील निकॉनच्या कॅमेऱ्यावर कॅनोनचे झाकण लावून व्हायरल केला गेलाय.
‘इंडिया टुडे’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर मोदींचा चित्त्यांची फोटोग्राफी करतानाचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. या व्हिडिओमध्ये देखील कॅमेऱ्याच्या लेन्सवर कव्हर नसल्याचे बघायला मिळतेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान मोदींचा कॅमऱ्याच्या लेन्सवरील कव्हर न काढताच फोटोग्राफी करतानाचा फोटो एडिटेड आहे. मूळ फोटोशी छेडछाड करून निकॉन कंपनीच्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर कॅनन कंपनीचे कव्हर चिपकवण्यात आले आहे.
हेही वाचा- भारत जोडो यात्रा: राहुल गांधींनी विवेकानंदांना अभिवादन न केल्याचा स्मृती इराणी यांचा दावा चुकीचा!
Be First to Comment