केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये काही लोक स्मृती इराणी यांच्या ताफ्यासमोर निदर्शने देत असल्याचे बघायला मिळतेय. स्मृती इराणी या आपल्या कारमधून आंदोलक महिलेशी संवाद साधत असल्याचे देखील दिसतेय. दावा केला जातोय की व्हिडीओ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यानचा असून भाजपच्या प्रचारार्थ आलेल्या स्मृती इराणींचे स्वागत लोकांनी मुर्दाबादच्या घोषणा देऊन केले.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता व्हायरल व्हिडीओ 3 ऑक्टोबर 2020 रोजी टेन न्यूज या युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. हाथरसच्या मुद्द्यावर आंदोलकांनी स्मृती इराणींचा ताफा थांबविल्याची माहिती देखील त्यासोबत देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता नवभारत टाईम्सच्या वेबसाईटवर 3 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीमध्ये देखील व्हायरल व्हिडीओ बघायला मिळतोय.
बातमीनुसार घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाथरस बलात्काराच्या प्रकरणी स्मृती इराणी यांच्या वाराणसी दौऱ्याचा विरोध केला होता.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘स्मृती इराणी गो बॅक’च्या घोषणांसह इराणींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. स्मृती इराणी यांनी एका महिला काँग्रेस कार्यकर्त्याला मास्क घालण्यास सांगितले. ताफा रवाना झाल्यानंतर अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हिडीओ सध्याचा नसून साधारणतः दीड वर्षांपूर्वीचा आहे. व्हिडिओचा उत्तर प्रदेश निवडणुकांशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा- उत्तर प्रदेशात मते मागायला आलेल्या भाजप नेत्यास जनतेकडून बेदम मारहाण? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment