Press "Enter" to skip to content

नेहरूंनी शेवटच्या मुलाखतीत फाळणीचा निर्णय आपणच घेतल्याची कबुली दिली होती?

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्या मुलाखतीतील एक छोटीशी क्लिप व्हायरल होतेय. व्हायरल क्लिप सोबत दावा केला जातोय की 1964 साली दिलेल्या आपल्या शेवटच्या मुलाखतीदरम्यान स्वतः नेहरूंनी फाळणीचा (Partition of India) निर्णय आपणच घेतल्याची कबुली दिली होती.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता भारत सरकारच्या ‘प्रसार भारती अर्काइव्हज’च्या यूट्यूब चॅनलवर आम्हाला संपूर्ण मुलाखत बघायला मिळाली. जवळपास 45 मिनिटांच्या मुलाखतीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार ही नेहरूंची शेवटची मुलाखत आहे. अमेरिकन टीव्ही होस्ट अरनॉल्ड माइकलीस (Arnold Michaelis) यांनी ही मुलाखत घेतली होती.

व्हायरल व्हिडिओच्या 1 मिनिट 6 सेकंदाला नेहरू असं म्हणताना दिसताहेत की शेवटी मी निर्णय घेतला. याठिकाणी नेहरूंना विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यावर त्यांनी दिलेले उत्तर व्यवस्थित समजून घेणे महत्वपूर्ण ठरते.

पत्रकार अरनॉल्ड माइकलीस मुलाखतीच्या 14 मिनिट 34 व्या सेकंदाला नेहरूंना विचारतात: “तुम्ही आणि श्रीमान गांधी आणि श्रीमान जिना… फाळणीपूर्वी तुम्ही सर्वजण भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होता.”

अरनॉल्ड माइकलीस यांना मध्येच थांबवत नेहरू म्हणतात,

“श्रीमान जिना स्वातंत्र्यलढ्यात अजिबात सहभागी नव्हते…किंबहुना त्यांनी विरोधच केला होता. माझ्या मते, 1911 च्या आसपास मुस्लिम लीग सुरू झाली…ती खरं तर इंग्रजांनी सुरु केली..इंग्रजांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले कारण त्यांचा हेतू वेगळा गट निर्माण करण्याचा होता.. त्यांना काही प्रमाणात यशही आले आणि शेवटी फाळणी झाली.

त्यानंतर नेहरूंना प्रश्न विचारला जातो की तुमचा आणि गांधींचा फाळणीला पाठिंबा होता का?

या प्रश्नाच्या उत्तरात नेहरू म्हणतात,

“गांधीजींचा शेवटपर्यंत फाळणीला पाठिंबा नव्हता, शेवटपर्यंत नव्हता. एवढंच काय तर फाळणी झाल्यानंतरही ते या निर्णयास अनुकूल नव्हते. आणि माझा सुद्धा नव्हता. परंतु शेवटी इतर अनेकांप्रमाणेच मलाही असे वाटले की रोजच्या त्रासापेक्षा फाळणी बरी.

मुस्लिम लीगचे नेते मोठे जमीनदार होते…त्यांना जमीन सुधारणा नको होती आणि आम्हाला जमीन सुधारणा करायची होती, जी नंतर आम्ही केलीही. हेच एक कारण होते की आम्ही फाळणीसाठी तयार झालो कारण आम्हाला असे वाटले की ते जर सोबत असतील तर निरंतर संघर्ष सुरु राहील.”

नेहरूंच्या या उत्तरावरून हे स्पष्ट होते की नेहरूंनी ‘फाळणीचा निर्णय मी घेतला’ असे म्हटले नव्हते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फ़ॉर हिस्टोरिकल स्टडीज़च्या प्राध्यापक सुचेता महाजन अल्ट न्यूजशी बोलताना सांगतात, “फाळणी हा ब्रिटिश सरकारने घेतलेला निर्णय होता याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही. मुळात कुठलाही भारतीय पक्ष, मग तो काँग्रेस असो किंवा मुस्लीम लीग, दोन्हीही पक्ष फाळणी स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे नेहरूंनी ‘फाळणीचा निर्णय मी घेतला’ असे म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यावेळी ब्रिटिश सत्तेत होते. अखंड भारत किंवा भारताची फाळणी करायची हा त्यांचा निर्णय होता. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय, लुई माउंटबॅटन (Louis Mountbatten) यांनी एप्रिल/मे 1947 च्या सुमारास ब्रिटिश सरकारशी सल्लामसलत करून निर्णय घेतला की फाळणी हाच एकमेव उपाय आहे.”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या शेवटच्या मुलाखतीत फाळणीचा निर्णय आपणच घेतल्याची कबुली दिल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

हेही वाचा- पंडित नेहरू आणि मुहम्मद अली जिन्ना सावत्र भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल पोस्ट्स फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा