Press "Enter" to skip to content

‘जगप्रसिद्ध SONY कंपनी विकली गेली’ म्हणत ‘लोकमत’ पडलं ‘फेकन्यूज’ला बळी!

सोशल मीडियावर सध्या मायक्रोसॉफ्टने जगप्रसिद्ध सोनी कंपनी विकत घेतल्याची बातमी (Microsoft acquires sony) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. ”2020 ची काळी बाजू! सरतेशेवटी जगप्रसिद्ध SONY कंपनी विकली गेली’ या मथळ्याखाली मराठीतील प्रमुख वृत्तपत्र ‘लोकमत’ने तसेच याच आशयाची बातमी ‘एकमत’ने देखील ही प्रसिद्ध केली आहे.

Advertisement
Lokmat Ekmat fake news about Sony
Source: Lokmat/ Ekmat

‘लोकमत’च्या बातमीनुसार सोनी-मायक्रोसॉफ्ट डीलमुळे सोनीचा मोबाईल व्यापार, पेटंट, कॅमेरा, व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील काम आदी आता मायक्रोसॉफ्टचे झाले आहे. व्हिडीओ गेमचे प्लेस्टेशनही मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेले आहे. मायक्रोसॉफ्ट सध्या प्लेस्टेशन ५ ची विक्री सुरुच ठेवणार आहे. आता त्यांची टीम एक्सबॉक्स सोनीचे सर्व कंटेंट एक्सबॉक्समध्ये आणण्याची तयारी करणार आहे. हा सौदा १३० अब्ज डॉलरचा झाला आहे.

डीलचा फायदा एक्सबॉक्सच्या ग्राहकांना होणार आहे, कारण त्यांना सोनीचे प्लेस्टेशनवरील गेमदेखील उपलब्ध होणार आहेत. त्यांना स्पायडरमॅन आणि दी लास्ट ऑफ अस असे पॉप्युलर गेम खेळता येणार आहेत. या डीलमध्ये सोनीचा स्मार्टफोन बाजारही आहे. तो सध्या सोनीच्या व्हिडीओ आणि साऊंड उत्पादनांमध्ये येतो, असा दावा ‘एकमत’च्या बातमीमध्ये करण्यात आला आहे.

पडताळणी:

मायक्रोसॉफ्टने १३० अब्ज डॉलरमध्ये सोनी कंपनी विकत घेतली असेल तर ही खऱ्या अर्थाने मोठी बातमी ठरली असती. सहाजिकच बहुतेक मोठ्या माध्यमांमध्ये ही बातमी बघायला मिळाली असती. मात्र ‘लोकमत’ आणि ‘एकमत’ शिवाय हिंदी किंवा इंग्रजीतील इतर कुठल्याही महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये आणि वृत्तवाहिनीवर ही बातमी नसल्याने आम्ही पडताळणी सुरु केली.

आम्हाला ‘इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स’च्या वेबसाईटवर प्रकाशित बातमी मिळाली. या बातमीनुसार मायक्रोसॉफ्टने १३० अब्ज डॉलरमध्ये सोनी कंपनीची खरेदी केल्याचा दावा (Microsoft acquires sony) करणारी बातमी सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आली ती एका स्पॅनिश वेबसाईटवर. स्पॅनिश वेबसाईटवर बातमी प्रसिद्ध करण्यात आली ती 28 डिसेंबर रोजी. हा दिवस हिस्पॅनिक संस्कृतीत “डे ऑफ द होली इनोसेन्ट्स” म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

“डे ऑफ द होली इनोसेन्ट्स” हा दिवस साधारणतः आपल्याकडच्या ‘एप्रिल फूल’ सारखा असतो. याच औचित्यावर स्पॅनिश वेबसाईटवर मायक्रोसॉफ्टने सोनी कंपनी विकत घेतल्याची बनावट बातमी प्रसिद्ध केली गेली होती. या बातमीला दुजोरा देणारी कुठलीही अधिकृत माहिती ‘मायक्रोसॉफ्ट’ अथवा ‘सोनी’ कडून देण्यात आलेली नाही.  

ट्विटरवर देखील हीच माहिती मिळाली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘मायक्रोसॉफ्ट’ने ‘सोनी’ कंपनी विकत घेतल्याची बातमी चुकीची असून या बातमीला कुठलाही आधार नाही.

आपल्याकडील ‘एप्रिल फूल’ सारख्या औचित्यावर ही बातमी सर्वप्रथम स्पॅनिश वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आणि अनेकांनी ती खरी समजून सोशल मीडियावर शेअर करायला सुरु केली.

‘लोकमत’ आणि ‘एकमत’ सारखी वृत्तपत्रे देखील या ‘फेकन्यूज’ला बळी पडले.

हे ही वाचा- अदानी समूहाने पुणे जंक्शनच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपयांपर्यंत वाढविली?

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा