भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या निर्दयी संघटनेला महत्व देऊन मोदी-शाह जोडीला विरोध न करता त्यांच्या हाती देश दिल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केल्याचा दावा करणारे ट्विट (lalkrishna adwani twitter) सोशल मीडियात व्हायरल होतेय.
काय आहे व्हायरल ट्विट?
“मेरी जिंदगी की सबसे बडी गलती मेरा आरएसएस जैसे निर्दयी संघ को अहमियत देना, मैने आरएसएस की हमेशा सेवा की, मैं राजनीती में उन लोगों को आगे लेकर आय जो संघ से जुडे चेहरे थे, मैने देश की भलाई के बारे में सोचा हमेशा! लेकीन मुझे नहीं पता था की मेरी एक भूल देश को नरक में धकेल देगी.
मैने मोदी शाह का यह सोचकर विरोध नहीं किया, की ये मेरे हाथों मे पले बढे मेरे बच्चे देश को विश्वगुरु बनायेंगे, लेकीन आज देश की हालात इन दोनों की जोडी ने ऐसी कर डी है की जनता को श्वास तक नसीब नहीं हो रही है. मुझे ऐसा पता होता तो मैं इन व्यापारियोको कभी देश नहीं देता”
– लालकृष्ण अडवाणी (व्हायरल ट्विट)
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक करण गायकवाड, शंकर सानप, ललित बंडे आणि यशवंत पाटील यांनी व्हायरल ट्विटचा स्क्रिनशॉट पाठवून पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने वाचकांच्या विनंतीवरून पडताळणी केली, त्यात जे गवसले ते पुढीलप्रमाणे-
१. ते ट्विट आणि ट्विटर हँडल गायब आहे
सर्वात आधी आम्ही ट्विटरवर जाऊन, ज्या ट्विटर हँडलवरून ते ट्विट केले आहेत, ते शोधले. परंतु @LK_Adwani असे ट्विटर हँडल (lalkrishna adwani twitter) सुद्धा सापडले नाही, ना व्हायरल ट्विटमधील मजकूर असलेले इतर कुठले ट्विट आढळले. याचा अर्थ असा की कदाचित ते ट्विटर हँडल डिलीट केले गेले असावे किंवा ट्विट डिलीट करून हँडलचे नाव बदलले असावे.
२. ‘ब्ल्यू व्हेरिफिकेशन मार्क’ नाही
सेलिब्रिटी किंवा नेते मंडळींचे ट्विटर हँडल खरे आहे की फेक हे ट्विटरच्या ‘ब्ल्यू व्हेरिफिकेशन मार्क’वरून समजते. ट्विटर स्वतः त्या व्यक्तीच्या खरेपणाची खातरजमा करून नावाच्या पुढे निळ्या रंगाचा मार्क देते. असा मार्क व्हायरल ट्विटमधील नावासमोर नाही म्हणजेच ते त्या व्यक्तीचे अधिकृत अकाउंट नाही.
३. अडवाणी ट्विटरवर नाहीत
लालकृष्ण अडवाणी यांचे किंवा त्यांच्या ऑफिसचे ट्विटरवर व्हेरीफाईड अकाऊंट नाही. म्हणजेच ते ट्विटरवर नाहीत.
४. अडवाणी यांच्या नावात ‘W’ नाही
त्यांच्या नावे ट्विटरवर बरेच अकाऊंट आहेत. त्यातील काहींनी हे पॅरडी अकाऊंट असल्याचे, फेक अकाऊंट असल्याचे बायोमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे परंतु काही अकाऊंट्स त्यांचे ओरीजनल अकाऊंट असल्याचे भासवत आहेत. ते खोटे असल्याचे ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नावाच्या स्पेलिंगमधील चूक.
लोकसभेच्या ऑफिशियल वेबसाईटवर लाल कृष्ण अडवाणी यांची माहिती आहे. त्यात आडनावाचे स्पेलिंग Adwani असे नसून Advani असे आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की लालकृष्ण अडवाणींनी संघाची साथ आणि मोदी-शाहच्या ताब्यात देश दिल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केल्याचे दर्शवणारे ट्विट फेक आहे.
हे ही वाचा: मृत्यू प्रमाणपत्रावर देखील मोदींचा फोटो छापण्यात आलाय का?
Be First to Comment