विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. याच चित्रपटाच्या संदर्भाने भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा (Lal Krishna Advani) एक व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की हा चित्रपट बघून अडवाणींना रडू कोसळले.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला विधू विनोद चोप्रा फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 7 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला. ट्विटनुसार हा व्हिडीओ ‘शिकारा’ चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यानचा आहे.
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘शिकारा’ हा चित्रपट देखील काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या विषयावर आधारित होता. हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ‘आज तक’च्या वेबसाईटवर देखील यासंबंधीची बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘द काश्मीर फाइल्स’ पाहून लालकृष्ण अडवाणींना रडू कोसळल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडीओ ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाशी निगडित नसून दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘शिकारा’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यानचा आहे.
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]