केरळमध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झालीये की हिंदूंना आपले सण उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. केरळ पोलिसांनी (Kerala Police) हिंदूंना गणेशोत्सव (Ganeshotsava) सुद्धा साजरा करू दिला नाही. अशा दाव्यांसह एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
‘गणेशोत्सव में केरल में ये हालात हो गए है.कि हिन्दू अपना त्योहार भी नहीं मना सकता हैRSS चाहे कितना भी प्रेम दिखा ले केरल मे, लेकिन जेहादी तुमको सिर्फ नफरत ही देगे।’ अशा कॅप्शनसह अनेकांनी फेसबुक ट्विटरवर हे दावे शेअर केले आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक चंद्रकुमार श्रीवास्तव आणि निसार अली यांनी व्हॉट्सऍपवर देखील अशाच प्रकारचे दावे मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- व्हायरल व्हिडिओ व्यवस्थित ऐकल्यावर लक्षात येते की त्यात बोलली जाणारी भाषा मल्याळम नसून तेलुगु आहेत. प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तेलंगाना ही दोन राज्ये तेलुगु भाषिक आहेत. ही घटना यापैकी नेमक्या कोणत्या राज्यातील आहे हे शोधण्यासाठी आम्हाला व्हायरल व्हिडीओतील पोलिसाच्या हातावर असणाऱ्या बॅजचा उपयोग झाला.
- स्क्रिनशॉटमध्ये दिसत असलेल्या बॅजवर सर्वत्र निळा रंग आणि मध्यभागी लाल रंगाने पोलीस असे लिहिले आहे. हा बॅज तेलंगाना पोलीस बॅज सोबत तंतोतंत जुळतोय. केरळ पोलिसांचा बॅज अगदीच वेगळा आहे.
- याच अनुषंगाने तपासत असताना हैद्राबादच्या ओल्ड टाऊन भागात पोलिसांनी गणेश स्थापनेस नकार दिल्याची माहिती देणारे काही व्हिडीओज फेसबुकवर पोस्ट केल्याचे आम्हाला आढळले. ‘ओल्ड टाऊन भागात गणपतीलाच अटक झाली आहे. हैद्राबादमध्ये एका ग्रुपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गणपती प्रतिष्ठापना रोखली. गणपतीला पोलिसांनी अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आपण भारतच राहतोय ना? की अफगाणिस्थानमध्ये?’ अशा प्रकारचा मजकूर त्यात लिहिला आहे.
- या संपूर्ण प्रकाणाविषयी जाणून घेण्यासाठी ‘आज तक‘ने हैद्राबाद ओल्ड टाऊन भागातील संतोषनगर पोलिस स्टेशनचे अतिरिक्त निरीक्षक रवी कुमार यांच्याशी संपर्क साधला होता.
“ज्या जागेवर हा गणपती बसवणार होते ती जागा विवादास्पद आहे. रक्षा पूरम कॉलनीची ती जमीन की कुणा वैयक्तिक अधिकाराची, यावर वाद चालू आहेत. तरीही कॉलनीतील लोकांनी तिथेच गणपती बसवण्याचे ठरवल्याने दुसऱ्या दावेदाराने पोलिसांत तक्रार केली. यावरच कारवाई करत पोलिसांनी ती प्रतिष्ठापणा रोखत संभाव्य भांडणास नियंत्रित केले. यात कुठेही धार्मिक विवादाचा संबंध नाही.”
– रवी कुमार (अतिरिक्त निरीक्षक, संतोषनगर पोलीस स्थानक)
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे फेक असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल व्हिडीओ केरळचा नसून तेलंगाना मधील हैद्राबादचा आहे. जागेच्या मालकीवरून वाद असल्याने त्या जागी गणपती बसवू दिला गेला नाही, यात कुठेही हिंदू मुस्लीम किंवा इतर धार्मिक विवादाचा संबंध नाही.
हेही वाचा: केरळमधील मुस्लिमांनी तलवारीने आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे का?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: केरळमध्ये हिंदूंना गणेशोत्सव साजरा क… […]