सोशल मिडीयामध्ये एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. दावा केला जातोय की “पाकिस्तान जिंदाबाद, भारत को हम हिंदू राष्ट्र नहीं बनने देंगे” अशा घोषणा देणाऱ्या देशद्रोही तरुणांना भारतीय सैनिकांनी जोरदार ठोकून राष्ट्रगीत गायला भाग पाडले.
फेसबुक, ट्विटरवर हे दावे अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील, निशिकांत गोळे, विनीत पाउलबुधे, तानाजी कांबळे, सतीश तुंगे, नंदकिशोर भारसाखळे, किरण साळुंखे, डॉ. भारत पाटोळे आणि भरत जाधव यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने इनव्हिड टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स गुगल रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता काही बातम्या बघायला मिळाल्या.
दिल्लीत २०२० मध्ये उसळलेल्या दंगली दरम्यान (Delhi Riots) पोलिसांच्या भूमिकेवरच अनेकांनी संशय व्यक्त केला होता. काही व्हिडीओजमध्ये मुस्लीम घरांवर दगडफेक करणाऱ्या हिंदू टोळक्यांच्यासोबत पोलिसही दिसत होते. याच दंगलीच्या काळात २४ फेब्रुवारी २०२० रोजी घडलेल्या घटनेचा तो व्हिडीओ आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ५ पैकी ३ तरुण दिल्लीच्या कर्दमपुरी मोहल्ल्यातील आहेत. या पाच जणांना भारतीय सैनिक नव्हे, तर दिल्ली पोलीस अमानुषपणे मारहाण करत राष्ट्रगीत गाण्याची जबरदस्ती करत आहेत. या मारहाणीत जखमी झालेला २३ वर्षीय फैजान उपचारादरम्यान मृत घोषित केला गेला. त्याच्या आईने फैजानच्या मृत्यूस दिल्ली पोलिसांना जबाबदार धरत तक्रार दाखल केलीय.
दिल्ली उच्च न्यायालयात नुकतीच १२ जानेवारी २०२२ रोजी याविषयी सुनावणी झाली. सदर व्हायरल व्हिडीओमधील पोलीस कर्मचारी नेमके कोण होते याविषयी अजूनही तपास न लागल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेला खडे बोल सुनावले. पुढील सुनावणीची तारीख २२ फेब्रुवारी देत ठोस तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेसंबंधित एकाही बातमीमध्ये या तरुणांनी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा उल्लेख नाही. न्यायलयीन सुनावणीमध्येसुद्धा या तरुणांचा नेमका अपराध काय होता याचा स्पष्टपणे उल्लेख आढळला नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणांनी देशद्रोही घोषणाबाजी केल्याचे अधिकृत पुरावे उपलब्ध नाहीत, तसेच त्यांना मारहाण करत जबरदस्ती राष्ट्रगीत म्हणण्यास भाग पाडणारे सैनिक नसून दिल्ली पोलिस आहेत. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना गंभीर स्वरुपाची असून याविषयी दिल्ली उच्च न्यायालयाने तपासणीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: पाकिस्तानात हिंदू महिलांना विवस्त्र करून बाजारभर फिरवल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment