Press "Enter" to skip to content

संघाच्या अमेरिकेत झालेल्या विजयादशमी संचलनास भारतीय माध्यमांनी मुद्दाम प्रसिद्धी दिली नाही?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) अमेरिकेत विजयादशमीच्या दिवशी संचलन (Vijayadashmi Sanchalan)केले परंतु भारतीय माध्यमांनी त्यास प्रसिद्धी दिली नाही. आता ती प्रसिद्धी देण्याची जबाबदारी आमची आहे असा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

“रा. स्व. संघाचे अमेरिकेतील विजयादशमी संचलन. भारतीय माध्यमांनी सोयीस्कररित्या याला ब्लॉक केले आहे. ते व्हायरल करायची जबाबदारी आमची आहे.” अशा कॅप्शन सह तो साधारण १.४० मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Archive

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जवाहरलाल साळुंखे, कैलास ढवळे आणि वाघेश साळुंखे यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केल्यानंतर ‘जिया न्यूज मुंबई’ या युट्युब चॅनलवर २० ऑक्टोबर २०१९ रोजी अपलोड झालेला हाच परंतु अधिक चांगल्या दर्जाचा व्हिडीओ सापडला.

याच्या कॅप्शनमध्ये हे संचलन ‘RSS’ म्हणजेच ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे नसून अमेरिकेतील ‘HSS’ म्हणजेच ‘हिंदू स्वयंसेवक संघा’चे आहे असे लिहिले आहे. खाली अधिकच्या मजकुरात या ‘जिया न्यूज मुंबई’ युट्युब चॅनलने हे स्पष्ट केले आहे की सदर व्हिडीओ त्यांना त्यांच्या प्रेक्षकाकडून प्राप्त झाला आहे.

तो व्हिडीओ व्यवस्थित पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की गाडीच्या बोनेटवर ‘HSS-USA’ असे लिहिले असून वर इंग्रजीत हिंदू स्वयंसेवक संघ लिहिले आहे. त्यासमोर सिंहाचे चित्र असणारा लोगो देखील आहे.

‘हिंदू स्वयंसेवक संघा’विषयी अधिक माहिती घेताना असे समजले की ही ‘रा.स्व.संघा’चीच विदेशातील संघटना आहे. भारताबाहेर ‘राष्ट्रीय’ या नावाने संघटना करणे अतार्किक असल्याने ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे नाव देण्यात आले. ‘झी न्यूज‘च्या माहितीनुसार या संघटनेने ३९ देशांत ‘एनजीओ’ म्हणून नोंदणी केली आहे.

या संघटनेच्या सर्व देशांत विविध ठिकाणी दर आठवड्याला किंवा दर दोन आठवड्याला शाखा भरत असतात. ५ आखाती देशांत खुल्या शाखा भरविण्यास बंदी असल्याने लोकांच्या घरीच सर्वजण जमत असतात. नेपाळमध्ये सर्वात जास्त शाखा भरतात, त्या खालोखाल अमेरिकेत १४६ शाखा भरत असतात.

व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या गाडीवर रा.स्व.संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार, माधव गोळवलकर यांच्या प्रतिमा असल्या तरीही ‘हिंदू स्वयंसेवक संघा’च्या अधिकृत वेबसाईटवर कुठेही ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा उल्लेख करण्यात आला नाही. किंबहुना या नेत्यांचाही कुठेच उल्लेख नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल व्हिडीओत संचलन करणारी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नव्हे तर ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असल्याचे समजले. सदर संचलन नेमक्या कोणत्या कार्यक्रमानिमित्त करण्यात आले होते हे जरी समजले नसले तरीही ते आताचे नसून २०१९ सालातील किंवा त्या आधीचे असल्याचे खात्रीपूर्वक समजले. सहाजिकच आहे की भारतीय माध्यमे जुनी घटना ताजी असल्याचे दाखवत आता बातम्या का देतील? म्हणजेच व्हायरल दावे चुकीचे आहेत.

हेही वाचा: उकळत्या पाण्यात बसलेल्या मुलाचे रहस्य काय? आधुनिक प्रल्हाद की फसवाफसवी? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा